वर्धा : निवडणूक जाहीर झाली आणि एकच लगबग उडाली. नेते व कार्यकर्ते कामाला लागले. उमेदवार कोण? हे बाजूला सारून कामाला लागणाऱ्या पक्षात अर्थात भाजपच आघाडीवर. आपण व्यक्तीसाठी नाही पक्षासाठी काम करतो, असा भाजपच्या वडिलधारी नेत्यांचा सांगावा असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध पक्षीय पदे तयार करीत कामास लावणाऱ्या भाजपने जिल्हानिहाय विधानसभा निवडणूक प्रमुख हे पद तयार केले. वर्धा जिल्ह्यासाठी नितीन गडकरी यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणारे सुधीर दिवे यांची नियुक्ती पण झाली. नियुक्ती झाल्याचे मान्य करताच दिवे यांनी सर्वप्रथम ‘लोकसत्ता’सोबत संवाद साधताना लोकसभा निवडणुकीत झालेली चूक आता होणार नाही, हे निक्षुन सांगितले. ते म्हणाले, वर्धा जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तीन व देवळी विधानसभा मित्र पक्ष शिवसेनेने लढवली. पण या निवडणुकीत देवळीची जागाही भाजपच लढविणार. शंभर टक्के खात्री आहे. उमेदवारपण निश्चित आहे. नाव जाहीर करण्याचा अधिकार माझा नाही, तो अधिकार निवडणूक समिती व ज्येष्ठ नेत्यांचा आहे. म्हणून मी भाष्य करणार नाही. लोकसभा निवडणुकीत नागपूरची निवडणूक आटोपल्यावर मला वर्ध्याची जबाबदारी पार पाडावी लागली. वेळ कमी मिळाला. आता ही चूक टळली आहे. मी जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी व हिंघणघाट या चारही मतदारसंघांची जबाबदारी घेत काम करणार. या चारही जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. अंमल मी करणार. उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघांत आम्ही किमान ५० हजार मतदारापर्यंत पोहचणार, अशी भूमिका सुधीर दिवे यांनी मांडली.

हे ही वाचा…वनविभागात चोर सोडून संन्याशाला फाशी !

आर्वी मतदारसंघ हा पक्षासाठी अवघड जागेचे दुखणे ठरला आहे. गेल्या निवडणुकीत सुधीर दिवे यांनी अखेरच्या क्षणापर्यंत तिकिटसाठी खिंड लढविली होती. पण केचेंचे नाव फायनल झाले. आता देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हटल्या जाणारे सुमित वानखेडे प्रबळ इच्छुक आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी आर्वी क्षेत्रात ओतलेला निधी व मार्गी लावलेल्या योजना, यांमुळे तेच उमेदवार राहतील, असे आर्वीतील भाजप कार्यकर्ते म्हणतात. पण विद्यमान आमदार दादाराव केचे स्वतःच्या तिकिटाची खात्री देत आहेत. या पाश्वाभूमीवर सुधीर दिवे यांची नियुक्ती खळबळ निर्माण करणारी ठरणार. कारण, भाजप वर्तुळत आर्वी हा केंद्रबिंदू ठरला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In upcoming assembly election bjp will contest all four wardha seats pmd 64 sud 02