यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेंतर्गत ३३ केव्हीचे एक्स्प्रेस फिडर बसविण्याच्या कामात अनियमितता झाल्याचा ठपका न्यायालयाच्या आदेशावरून ठेवण्यात आला होता. या प्रकरणात कंत्राटदार व वीज वितरणचे अभियंते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाशी थेट संबंध असलेले येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय चितळे यांना आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. त्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेच्या कामावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या योजनेत वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरणाकडून ३३ केव्ही एक्स्प्रेस फिडरचे काम करण्यात आले. सहा कोटी ५४ लाखांच्या या कामात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. अजिंक्य पाटील यांनी माहिती अधिकारातून हा अपहार बाहेर काढला. या प्रकरणात पात्रता नसणाऱ्या कंत्राटदारांना काम देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या अपहाराचा मुद्दा थेट विधिमंडळात गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कारवाईबाबत विचारणा केली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली. मात्र त्यापूर्वीच न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय चितळे हे दोषी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यावरून कंत्राटदार अतुल आसरकर, प्रमोद डोंबळे, विजय दंडे यांच्यावरही कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७७, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

हेही वाचा – अकोला : शास्तीच्या सहा कोटींचे समायोजन होणार; महापालिकेकडून दिलासा; शेवटच्या टप्प्यात कर वसुलीचा जोर

हेही वाचा – यवतमाळ : दरोड्याच्या उद्देशाने यवतमाळात आलेली टोळी देशी कट्ट्यासह जेरबंद

ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सुनील पाटील, मिलिंद गोफणे, दीपक आसरकर यांनी कार्यकारी अभियंत्याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले. अटक झालेले कार्यकारी अभियंता संजय चितळे हे सध्या हिंगोली येथे कार्यरत आहे. तेथे दोन उपविभागांचा प्रभार त्यांच्याकडे आहे. या कारवाईने वीज वितरणच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irregularities of six and a half crores in amrut yojana in yavatmal executive engineer arrested ssb