नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे नागपूरमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुरस्काराची घोषणा झाल्यावर गडकरी यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी एक वृत्तवाहिणीशी बोलताना या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी लोकमान्य टिळकांच्या नावाने मिळणारा पुरस्कार आणि गडकरींना आतापर्यंत विविध उपक्रमांसाठी मिळालेल्या ‘डी.लिट’ची त्यांची तुलना केली. कांचन गडकरी नेमक्या काय म्हणाल्या पाहूया.
कांचन गडकरी नेमके काय म्हणाल्या?
लोकमान्य टिळकांचे नाव हे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे. त्यांच्या नावाने असणारा पुरस्कार नितीनजींना मिळणे हा आनंदाचा क्षण आहे. घरामध्ये सर्वांना आनंद झाला आहे. नितीनजींना आतापर्यंत शेती आणि अन्य कामांसाठी १३ ‘डी.लिट’ची मिळाल्या आहेत. पण टिळकांच्या नावाचा पुरस्कार आगळावेगळा आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यावर अनेकांचे फोन येत आहेत.
एका ज्येष्ठ नातेवाईकाचा फोन आला. त्यावेळी ते म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार मिळणे मोठी गोष्ट आहे. टिळकांचे राजकारण वेगळे होते. तसे राजकारण करणारे नितीनजी आहेत हे यामुळे सिद्ध झाले. त्यांच्या कामांचा सन्मान आहे. यामुळे त्यांच्या सन्मानात मानाचा तुरा रोवला गेला, असे कांचन गडकरी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार मिळाला आहे. आता नितीनजींचे नाव त्यांच्या रांगेत रोवले जाणार आहे. घरातील सगळ्यांना टीळक माहिती आहेत. नातवंडांनी दुपारीच नितीनजींना फोन केला आणि मोठी पार्टी पाहिजे अशी मागणी केली, असेही कांचन गडकरींनी कौतूकाने सांगितले.
वाजपेयी, मनमोहन सिंग, मोदीही पुरस्कृत
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार १९८३ पासून प्रदान करण्यात येतो. पहिल्या वर्षी एस.एम. जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला, सुधा मूर्ती यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.