सुमित पाकलवार, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी गडचिरोली जिल्ह्यात सीमाभागातील बार आणि दारू दुकानांमधून ३० टक्के दारूची तस्करी होत असल्याचे मान्य केले. यामुळे पुन्हा एकदा बंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात होणाऱ्या दारू तस्करीचा मुद्दा चर्चिला जात असून गेल्या काही वर्षांपासून या तस्करीला पाठबळ देणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे.

मागील तीन दशकांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, ही बंदी केवळ नावापुरती असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात होत असलेली सर्रास दारूविक्री येथील नागरिकांसाठी नवी नाही. दरम्यानच्या काळात ठिकठिकाणी दारू तस्करी करणारे माफियाही तयार झाले. आधीच नक्षलवाद हा गंभीर प्रश्न हाताळणाऱ्या पोलीस विभागावर दारूबंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारीही आली. आजघडीला जिल्ह्यात दारूबंदी केवळ कागदावरच आहे. कधी तेलंगण, छत्तीसगड राज्यातून तर कधी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून होणारी दारूतस्करी पोलिसांना हैराण करून सोडणारी ठरते आहे. मधल्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील बंदी उठविण्यात आली. तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर व्याहाड, तारसा, ब्रम्हपुरी येथे पुन्हा बार आणि दारू दुकाने सुरू झालीत. यासोबत जिल्ह्यात दारू तस्करीचे प्रमाणदेखील वाढले आहे.

आणखी वाचा-यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, अशा आहेत तारखा…

सुरूवातीला कमी प्रमाणात होणारी तस्करी एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने पाठबळ दिल्यामुळे आज शेकडो कोटींच्या घरात पोहचली आहे. आपले राजकीय पद आणि वलय वापरून हा नेता सुरवातीला गडचिरोली जिल्ह्यात वाळू तस्करीसाठी कुप्रसिद्ध होता. चंद्रपुरातील दारूबंदी उठविल्यानंतर त्याने आपला मोर्चा चक्क दारू तस्करीकडे वळविला आहे. या कामासाठी त्याने आपली काही माणसेदेखील ठेवली आहे. अनेकदा ‘भाऊ’ची माणसे असल्याचा धाक दाखवून हे तस्कर पोलीस कर्मचाऱ्यांवर दबाव आणताना दिसून येतात. रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत एका विशिष्ट अशा ‘रित्झ’ नावाच्या चार ते पाच गाड्या तस्करीसाठी वापरतात. रात्रीच्या सुमारास या परिसरात फेरफटका मारल्यास या गाड्या बार आणि दुकानांपुढे उभ्या दिसतात. एव्हढेच नव्हे तर आपली दारू जिल्ह्यात सर्वत्र पोहोचली पाहिजे यासाठी या नेत्याने काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यावर इतर तस्करांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला होता. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने तस्करी होत असल्याची कबुली दिल्याने तस्करांचे आणि विभागाचेही पितळ उघडे पडले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस कारवाई सुरूच असते मात्र, उत्पादन शुल्क विभाग अस्तित्वात आहे का, हादेखील संशोधनाचा विषय आहे.

आणखी वाचा-डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार

पाच कोटींची दारू जप्त

गेल्या दहा महिन्यात पोलिसांनी दारू तस्करीविरोधात धडक कारवाई केली. यादरम्यान त्यांनी तब्बल ५ कोटींच्या दारूसह २ हजार अवैध दारू विक्रेते तसेच तस्करांना अटक केली. परंतु, यामुळे अवैध दारूविक्रीवर आळा बसलेला नाही. उलट काही दिवसांपासून विक्री आणि तस्करी वाढल्याचे चित्र आहे. पोलीस विभगातील काही अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन ठराविक तस्कारांवर कारवाई करतात व काहींना मोकळीक देतात अशी ओरड आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liquor smuggling in gadchiroli with support of political leader ssp 89 mrj