नागपूर : संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपुरात मंगळवारपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा अजून तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले आणि ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमासासाठी अमरावतीत आले आहेत.

कर्जमाफी हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा असलातरी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व विदर्भातील नेते बच्चू कडू आणि रविकांत तुपकर, ॲड. वामनराव चटप करीत आहेत. त्यांना  राजू शेट्टी, अजित नवले, महादेवराव जानकर आणि जरांगे पाटील यांनी समर्थन दिले आहे. विदर्भातील मुख्यमंत्री असल्याने आंदोलकांनी सरकारच्या प्रतिनिधीने नागपूरला येऊन चर्चा करावी, अशी अपेक्षा होती. परंतु राज्यमंत्री पाठवून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. ती चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर काल रात्री मुख्यमंत्र्यांनी फोनवरून बच्चू कडू यांना मुंबईला येऊन चर्चा करण्याचे निमंत्रण दिले.

ते निमंत्रण आंदोलकांनी स्वीकारले. आज दुपारी १ वाजच्या सुमारास बच्चू कडू आणि इतर नेते मुंबईत दाखल झाले. तर एका नियोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती येथे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत नियोजित कार्यक्रम आहेत. ते  अभिनंदन अर्बन को.ऑप बँक लि.च्या नूतन इमारतीचे लोकार्पण, त्यानंतर बँकेचा मुख्य कार्यक्रम, सांस्कृतिक भवन येथे आणि रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक लोकार्पण, दादासाहेब गवई स्मारक, अमरावती मार्डी रस्ता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे, अमरावती येथे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आज दुपारी ३ च्या सुमारास बच्चू कडू, राजू शेट्टी मुंबई विमानतळावर दाखल झाले.

आंदोलनाची पार्श्वभूमी

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी वर्धा मार्गावरील परसोडी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवरून काल रात्री झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू आणि शेतकरी नेते मुंबईला चर्चेसाठी गेले आहे. मात्र, आंदोलन सुरूच असून आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. परसोडी येथील मोकळ्या जागेत मांडव टाकण्यात आले आहे. तेथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यासाठी आज जरांगे पाटील पोहोचले. यावेळी “सरकार जागे व्हा”, “शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी गेल्या ७५ वर्षांत सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना लुटले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मिळवण्यासाठी सरकारविरोधात प्रतिडाव टाकला गेला आहे. सरकारला प्रतिडाव टाकून प्रतिउत्तर देण्याची गरज आहे, असेही जरांगे म्हणाले. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी मंगळवारपासून नागपुरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा तिढा तिसऱ्या दिवशीही कायम आहे.