बुलडाणा : जेमतेम २५ वर्षांपूर्वी घोषित झालेल्या जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि जैवविविधतेने समृद्ध लोणार वन्यजीव अभयारण्याने राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. देशातील ४३८ राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांमधून लोणारने दहावा, तर राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या मूल्यांकनात लोणार अभयारण्यास ८८.२८ गुण मिळाले असून, त्याला ‘उत्तम व्यवस्थापन’ या सर्वोच्च श्रेणीत स्थान पटकावले आहे. २००० मध्ये लोणार अभयारण्याची घोषणा करण्यात आली होती. हे अभयारण्य ३६५ हेक्टरवर पसरलेले आहे.
जैवविविधतेने समृद्ध हे अभयारण्य बिबट, मोर, लांडगे, यांसह विविध प्रकारचे पक्षी, तसेच दुर्मिळ वनस्पती, औषधी वृक्ष याने समृद्ध आहे. बेसॉल्ट खडकांपासून बनलेले जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर असून त्याला ‘रामसर साइट’चा दर्जा आहे. लोणार सरोवर पर्यटनच नव्हे, तर संशोधन, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.
२०२० ते २०२५ या कालावधीत देशभरातील विविध अभयारण्यांमध्ये उपलब्ध सुविधा, संरक्षणासाठीच्या उपाययोजना, विकासकामे आणि व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अध्यक्षस्थानी गुजरातचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य संरक्षक डॉ. एच. एस. सिंग, तर सदस्य म्हणून डॉ. एस. के. सिंग, डॉ. बिभूती लाहकार आणि डॉ. सुतीर्था दत्ता यांचा समावेश होता.
सुचविण्यात आलेल्या सुधारणा
सरोवर परिसरातील ‘प्रोसोपिस’ आणि आक्रमक तणांचे निर्मूलन, निसर्ग व्याख्या केंद्राचे उन्नतीकरण आणि पुनर्स्थापन, जुन्या न वापरण्यात येणाऱ्या इमारतींचा सृजनशील पुनर्वापर, पर्यावरणपूरक संरचना आणि निसर्ग शिक्षणवाढ, योग्य निसर्ग मार्गाची रचना, क्षेत्रीय योजनांची आखणी, वन्यजीव संपत्ती, पाण्याचे स्रोत आणि पर्यावरणीय अभ्यासास येथे वाव असल्याच्या सुधारणा सुचविण्यात आल्या. दुसरीकडे मानांकनामुळे वर्ल्ड हेरिटेज दर्जासाठीच्या प्रयत्नांना चालना मिळेल अशी सुचिन्हे आहेत.