नागपूर : मध्य रात्री नाकाबंदीदरम्यान कारमध्ये सापडलेल्या तीन कोटी रुपयांची रोख रक्कम पाहून डोळे पांढरे झालेल्या मध्य प्रदेश पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी अपहार करत दीड कोटींची रोख रक्कम आपसांत वाटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मध्य प्रदेश पोलीस दलातील भ्रष्टाचाराची लक्तरे चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली आहे. मराठवाड्यातील जालना येथील एक व्यापारी मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन ८ ऑक्टोबरच्या रात्री मध्य प्रदेशातील कटनी येथून नागपूर मार्गे जात होता. त्याच वेळी रात्री दिडच्या सुमारास मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातल्या बांदोल पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ही कार थांबवली. यापैकी दीड कोटीहून अधिक रक्कम ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपसांत वाटून घेतली.
हा प्रकार चव्हाट्यावर येताच अख्ख्या ठाण्यावर वरिष्ठांनी निलंबनाची कारवाई करत उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सिवनी पोलीस ठाण्यातील उप विभागीय पोलीस अधिकारी पुजा पांडे, बंडोल पोलीस ठाण्याचे प्रभारी उप निरीक्षक अर्पित भैरम, सिवनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील मुख्य माखन, योगेंद्र चौरसिया, गाडीचा चालक रितेश, निरज राजपूत, बंदुकधारी केदार आणि हवालदार सदाफळ यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे मध्य प्रदेश पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
सरकारी कामात गैरव्यवहार,संशयास्पद वागणूक, कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि दिरंगाई सारख्या गंभीर कलमांखाली या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश पोलिसांची प्रतिमा डागाळल्याने वरिष्ठांनी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातल्या बंदोल पोलिस ठाणे हद्दीतील वळण रस्त्यावर ८ ऑक्टोबरच्या रात्री नाकाबंदी दरम्यान हा प्रकार घडला.
काय आहे नेमके प्रकरण
८ ऑक्टोबरला कटनीहून जालनाकडे जाणाऱ्या एका क्रेटा कारमध्ये (एम. एच-१३ ई. के. -३४३०) तीन कोटी आहेत, असा सुगावा उपविभागीय अधिकारी पांडे यांना लागला. त्यावर पांडे यांनी बंदूकधारी कर्मचारी, बांदोल पोलिस ठाण्याचे अर्पित भैराम यांना नाकाबंदीसाठी तैनात केले. पहाटे दिडच्या सुमारास सिलादेही येथे पोलिसांनी वाहन अडवले. त्यानंतर संपूर्ण रोख रकम्म पोलिसांनी जप्त केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उपनिरीक्षक देवेंद्र उईके यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन करून व्यापारी तक्रार देत असल्याचे सांगितले. त्यानंतर सोहन परमार आणि त्याचे तीन ठाण्यात आले. इथे वाटाघाटी झाली. अखेर ५० टक्केचा सौदा झाला. पोलिसांनी १.५ कोटी रुपये ठेवून घेतले आणि उर्वरित रक्कम व्यावसायिकाला परत केली. मात्र व्यापाऱ्याने पैसे मोजले असता त्यातही २५ लाख रुपये कमी निघाले. त्यानंतर संतप्त व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. याची माहिती माध्यमांना झाल्यानंतर प्रकरणाचे बिंग फुटले. जबलपूर परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक राकेश सिंह यांनी तडकाफडकी याची दखल घेत सहाय्यक पोलीस अधिक्षक आयुष गुप्ता यांना उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देत सर्व संशयित पोलिसांना निलंबित केले.