नागपुरी संत्री जेवढी प्रसिद्ध तेवढाच नागपूरचा तंबाखू मिश्रीत खर्रा. आरोग्यास अपायकारक असल्याने राज्यात सन २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू यांसारख्या अन्नपदार्थाचे सेवन व विक्री याबाबत बंदी आहे , प्रत्यक्षात मात्र पान ठेले आणि आश्चर्यजनक म्हणजे ऑनलाईन गुटखा उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
खुद्द भाजप आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. देशात कुठे नसतील इतके पाठवले नागपुरात आहेत, तेथे तंबाखू मिश्रित सुपारीचा खर्रा विकला जातो.यामुळे नागपूर तोंडाच्या कर्करोगाचे केंद्र ठरू लागले आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी दटके यांनी केली.
गुटखा खर्रा बंदी प्रतिबंधात्मक कारवाईच्या दृष्टीने यावरील अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून संयुक्तपणे कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे दटके म्हणाले. नागपूरसह राज्यात विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत आहे, बाहेरील राज्यातून तंबाखूजन्य पदार्थ राज्यात येत आहेत परंतु अन्न व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दटके यांनी सभागृहात सांगितले.
राज्यात काही ठिकाणी पोलिसांच्या कारवाईत जप्त केलेले अन्नपदार्थाचे नमूने अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी घेण्यास नकार दिल्यामुळे पुराव्यांअभावी पोलिसांकडून गुन्हे नोंदवले गेले नसल्याचेही समोर आले आहे, प्रशासनाच्या अशा चुकीच्या निर्णयांमुळे राज्यात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढत चालले असून यावर खटले चालवले जात नसल्याने दटके यांनी प्रभावी कारवाई करण्याची विनंती केली.
प्रशासनाकडून विक्रेत्यांना अप्रत्यक्ष संरक्षण दिल्याने कारवाईस टाळाटाळ होत आहे. गुटखा बंदीसाठी शासनाकडून कडक कारवाई करण्याची आवश्यकता दटके यांनी व्यक्त केली.