लोकसत्ता टीम बुलढाणा: लोकशाही मूल्यांची हत्या करून महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. हे जनादेश नसलेले सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची घणाघाती टीका, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथल्ला यांनी येथे केली. सरकारची कार्यपध्दती लक्षात घेता सरकार मधे कमिशन राज चा नंगानाच सुरू असल्याचेही ते म्हणाले. बुलढाणा येथे आज मंगळवारी, १३ ऑगस्ट रोजी काँग्रेस ची बुलढाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्याची विधानसभा निवडणूक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहून मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रभारी रमेश चेनिथला आज येथे आले. आढावा बैठकीपूर्वी त्यांनी स्थानिय बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे प्रसिद्धी माध्यमासोबत संवाद साधला. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते अनिस अहमद, प्रदेश काँग्रेस पदाधिकारी जयश्री शेळके, संजय राठोड,श्याम उमाळकर, आमदार सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, आमदारद्वय राजेश एकडे व धीरज लिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आणखी वाचा-मान्सून अलर्ट : मध्य भारतात पुन्हा सक्रिय होणार यावेळी बोलतांना चेनिथला यांनी पक्षाची विधानसभेची तयारीविषयक माहिती देतानाच राज्यातील 'ट्रिपल इंजिन' सरकारवर टीकेची झोड उठविली. राज्यात युतीचे सरकार ५० टक्के कमिशन पध्दतीने काम करीत आहे. देशातील सर्वात भ्रष्ट असलेले हे सरकार मनमानी पद्धतीने लूट करीत आहे. सामान्य जनता आणि शेतकरी यांच्याशी सरकारला काहीच सोयरसुतक नसल्याचे सांगून देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे.आम्ही केंद्रात असो वा राज्यात आमच्या (काँग्रेस आघाडी) सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचे काम केले आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असूनही हे सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करायला तयार नाही . हे सरकार ढिम्म आणि असंवेदनशील असल्याचे सांगून सर्व उद्योग गुजरातला नेण्याचे काम करीत आहे. यामुळे महाराष्ट्र भकास होत असून युवकांचा हक्काचा रोजगार हिरावून घेण्याचे काम करण्यात येत आहे. केंद्र सरकारवर तोंड सुख घेताना चेनिथला म्हणाले की एनडीए सरकारने सर्व स्वायत्त संस्थांची मुस्कटदाबी केली असून सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे.मनमानी पध्दतीने केंद्राचाही कारभार सुरू आहे वक्फ बोर्ड विधेयक याचे उत्तम उदाहरण आहे. कोणतीही चर्चा न करता हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले. त्यातील तरतुदी अन्यायकारक असल्याने काँग्रेस सह विरोधकांनी याला विरोध केला. यामुळे सरकारला हे विधेयक 'जेपीसी' कडे पाठविणे भाग पडले. आणखी वाचा-रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळणार; स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ प्रणालीमुळे… २/३ बहुमतासह… दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र मधील जनता, मतदार खंबीरपणे काँग्रेस व आघाडीच्या पाठीशी उभी राहिली. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. राज्यातील महायुतीच्या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून काँग्रेस सह महाआघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे. येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २/३ बहुमतासह राज्यात सत्तेवर येणारच, असा दावा चेनिथला यांनी यावेळी बोलून दाखविला. काँग्रेसचे सर्व नेते एकदिलाने विधासभेच्या तयारीला लागले आहे. प्रादेशिक विभाग आणि जिल्हा निहाय बैठका घेण्यात येत आहे. राज्यात काँग्रेस आणि आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मोठया संख्येने अर्ज सादर करण्यात आले आहे. लोकसभेच्या निकालाने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात कमालीचा उत्साह जाणवत आहे. महाविकास आघाडी मधील काँग्रेस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) यांच्या मधील जागा वाटप संदर्भात आघाडीची लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती देखील प्रभारी रमेश चेनिथला यांनी यावेळी बोलताना दिली.