अकोला : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जीवनाविषयी आत्मियता निर्माण करण्याच्या दृष्टिने शालेय अभ्यासक्रमात आता वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षणासह समाजसेवा शिकवली जाणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा २०२५ मध्ये या दोन नवीन विषयांचा समावेश आहे. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ते लागू राहतील. त्यामुळे वाहतूक सुरक्षेसह सामाजिक भान जोपासण्याचे धडे विद्यार्थ्यांना आता शाळेतूनच मिळतील.
शालेय शिक्षण ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वांगीण सुधारणा करण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आखण्यात आले. त्यानुसार राज्यात इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा प्रस्तावित मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केला. या मसुद्यामध्ये एकूण २० विषय दिले आहेत. त्यात नव्यानेच वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षणा आणि समाजसेवा हे विषय घेण्यात आले. समाजसेवा विषयात सामाजिक घडामोडी, अभिरुची, आत्मविश्वास आणि सामाजिक समस्या ओळखण्याची क्षमता निर्माण करण्याच्या अर्थाने दैनंदिन जीवनाशी संबंधित अभ्यासक्रम राहणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना सार्वजनिक जीवनाबद्दल आत्मियता निर्माण होण्यासह निःस्वार्थ सामाजिक सेवा देण्याबरोबरच स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांच्या तार्किक विचार क्षमतेबरोबरच कार्यकौशल्यांचा विकास याद्वारे होतो. हा विषय निरोगी सामाजिक वातावरण विकसित करण्यासाठी उपयुक्त असल्याचे शिक्षण परिषदेने स्पष्ट केले. वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण विषयाच्या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षिततेचे आणि नागरी संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांना जबाबदार, सुरक्षित आणि सक्षम नागरिक बनण्यास मदत करणे हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुजाण समाज घडविण्यास महत्त्वपूर्ण हातभार लागेल, असा विश्वास शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्यक्त केला. या संपूर्ण मसुद्यावर २७ ऑगस्टपर्यंत शिक्षण तज्ज्ञ, पालक व नागरिकांना सूचना व अभिप्राय ऑनलाइन नोंदवता येणार आहेत.
१८ घटकांवर अभ्यासक्रम; १५६ तासिका
वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण या विषयाचा नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १८ घटकांवर अभ्यासक्रम तयार केला. यामध्ये नववीसाठी वाहतूक सुरक्षा दल, नागरी संक्षरण, नागरी संक्षरण संघटना, वाहतूक नियंत्रणाचे इशारे, वाहतुकीचे नियम, वाहनांचे प्रकार व राज्यांचे संकेत, अग्निशमन, आपत्ती व त्याचे प्रकार, पदकवायत, प्रथमोपचार, तर दहावीसाठी वाहतूक सुरक्षा दल, संघटनेचे रचना व कार्य, पट्टीबंधन, आघात, आपत्ती व्यवस्थापन, रस्त्यावरील चिन्हांची भाषा आदींचा समावेश केला. या विषयाचे नववी व दहावीमध्ये प्रत्येकी ७८ प्रमाणे १५६ तासिका घेण्याचे नियोजित आहे.
व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा २०२५ मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासह व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या दृष्टिने अंतर्भाव केल्याचे शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांनी सांगितले.