Heavy Rain Warning In Maharashtra : दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेले काही दिवस पावसाने राज्यातील अनेक भागात दडी मारली होती. दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जाहीर केला आहे. मात्र, पाऊस येणार की इशाऱ्यावरच समाधान मानावे लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी देखील विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पावसाच्या हलक्या सरी वगळता मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मात्र, शुक्रवारसाठी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा – गोंदिया विधानसभेवर विद्यमान अपक्ष आमदारासह यांचाही दावा

हवामान खात्याने राजधानी मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे आणि कोकण किनारपट्टी परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना आज, शुक्रवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे गुरुवारी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या, पण विदर्भात फारसा पाऊस पडलाच नाही. मराठवाड्याला देखील पावसाची अपेक्षा असताना हवामान खात्याने मोसमी पाऊस सक्रिय होऊन मुसळधार पावसाच्या दिलेल्या अंदाजामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हेही वाचा – महाकालीची नगरी ते गुन्हेगारांचे शहर, का बदलतेय चंद्रपूरची ओळख ? राजकारण्यांनी पोसून ठेवलेल्या…

राजधानी मुंबईत मात्र गुरुवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक भागात मध्यरात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. जून महिन्याच्या पूर्वार्धात राज्यातील अनेक भागात मोसमी पाऊस दाखल झाला होता, पण त्यानंतर जूनच्या उत्तरार्धात मात्र पावसाने ब्रेक घेतला. आता पुन्हा जुलै महिन्यात राज्याच्या अनेक भागात मोसमी पाऊस सक्रिय होत आहे. पुढील दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागांत ऑरेंज तर काही ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो, की पावसाच्या हलक्या सरी कोसळून पाऊस दडी मारतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather update meteorological department has warned of rain but rgc 76 ssb