नागपूर : ‘मोंथा’ चक्रीवादळाने त्याचा प्रवास थांबवला, पण अवकाळीने मात्र चिंता वाढवली. आता अवकाळी पाऊसही परतण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीपासून असणारी थंडीची प्रतिक्षाही संपणार, असे म्हणायला हरकत नाही. नोव्हेंबरच्या दूसऱ्या आठवड्यात थंडीची दीर्घ प्रतिक्षा संपणार असून हिवाळ्याची सुरुवात होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. एकीकडे पावसाचे अंदाज व्यक्त होत असतानाच ऑक्टोबर संपून नोव्हेंबर सुरू झाला तरीही थंडीचा थांगपत्ता नाही. त्यामुळे हिवाळा नेमका कधी सुरु होणार, असाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. दरम्यान, हवामान खात्याने अवकाळी पावसाचा माघारी फिरण्याचा प्राथमिक अंदाज अलीकडेच वर्तवला आणि त्यानंतर थंडीची चाहूल लागेल, असाही अंदाज व्यक्त केला. पाच नोव्हेंबरपासून थंडीसाठी वातावरण निर्मिती सुरू होईल.

त्यामुळे आता उकाडा, अवकाळी निवळून हळूहळू राज्यात थंडी वाढणार आहे. त्यामुळे यंदा तापमानाचा निच्चांकी आकडा कुठे पाहायला मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नवरात्र गेली, दिवाळी गेली आता तर तुळशीचे लग्नही पार पडले, मात्र अजूनही राज्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही पावसाने एग्झिट घेतली नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजाने दिलासा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. कधी मुसळधार तर कधी मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सर्वसामान्य माणूसही त्रासला आहे. अरबी समुद्रात अद्यापही कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असल्याकारणाने मध्य महाराष्ट्र, कोकणात हलक्या सरी कोसळत आहेत.

दरम्यान, सहा ते आठ नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. थंडीची चाहूल लागणार असल्याचे सांगण्यात आले असले तरीही नोव्हेंबर महिन्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात चार आणि पाच नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता असून सहा नोव्हेंबरपासून राज्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे सहा नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची सुरूवात होऊ शकते. पावसाळी वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरीही रविवारी नागपूर शहरातही मूसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही तासाच्या पावसात जनजीवन विस्कळीत झाले.