नागपूर : विद्युत क्षेत्रातील खासगीकरणविरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंता-अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवस तिन्ही कंपन्यांतील वीज यंत्रणेचा संपूर्ण डोलारा संपावर नसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर राहणार आहे. या काळात गंभीर तांत्रिक दोष उद्भवल्यास तासंतास वीज खंडित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राज्यातील अनेक अधिकारी कर्मचारी बुधवारी मध्यरात्री १२ वाजताच्या ठोक्यावर विद्युत कंपनी आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत संपावर गेले. विद्युत कंपन्यांचे खासगीकरण सहन करणार नसल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यात महावितरणचे साडेपाच हजारच्या जवळपास अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वोच्च पदावरील निवडक अधिकारी सोडता,  ९० टक्क्यांहून अधिक अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत*, असा कृती समितीचा दावा आहे. तर महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये तसेच महापारेषणमध्येही अशीच स्थिती राहणार आहे.

दरम्यान, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अधूनमधून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या परिस्थितीत गंभीर वीज यंत्रणेतील दोष उद्भवल्यास, संपामुळे दुरुस्तीच्या कामात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

महावितरण प्रशासनाकडून सांगण्यात आले की, बाह्यस्त्रोत कर्मचारी, अप्रेंटिशीप व एजन्सीचे मिळून सुमारे दोन हजार कर्मचारी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात कामावर राहणार आहेत. या कर्मचाऱ्यांकडून इतर कामे कमी करून दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य दिले जाईल, असा प्रशासनाचा दावा आहे. तर महानिर्मितीच्या वीज निर्मिती प्रकल्पातही हीच स्थिती राहणार असून, वीज निर्मिती संचात तांत्रिक दोष आल्यास वीज निर्मितीवर परिणाम होण्याचा धोका आहे.

या संदर्भात महानिर्मितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, प्रशासन अखंडित वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले असून, प्रसंगी एजन्सीकडून अतिरिक्त मनुष्यबळ पुरवठ्याची मदत मागवण्यात आल्याचेही महावितरणकडून कळविण्यात आले.

महानिर्मिती मुख्यालयातील अधिकारी वीज निर्मिती प्रकल्पात महानिर्मितीमधील अधिकाऱ्यांची एक संघटना संपावर नाही. त्यामुळे त्या संघटनेतील अधिकारी तसेच मुख्यालयातील अधिकारी यांना नागपूरच्या कोराडी आणि खापरखेडासह इतर वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचारी वाढवून वीज निर्मितीवर परिणाम होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांनी दिली.