अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याची स्वप्न अनेक तरुण उराशी बाळगतात. कुणाचे स्वप्न यशस्वी होते, तर अनेक तरुण-तरुणींना वारंवार प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करावा लागतो. ‘एमपीएससी’च्या परीक्षेत अकोला जिल्ह्यातील मामा-भाच्याने मात्र कमालच केली.

दोघांनीही एकाच वेळी ‘एमपीएससी’ परीक्षेला गवसणी घालून उज्ज्वल यश मिळवले. आर्थिक अडचणींवर मात देऊन मामा व भाचा राज्य शासनामध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. या कामगिरीमुळे मामा-भाच्यावर कौतुक वर्षाव होत आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या शिर्ला गावातील मामा-भाच्याची ही यशोगाथा आहे. शिर्ला गावातील मामा राजेंद्र घुगे आणि भाचा प्रतीक पारवेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. मामाने चौदावा, तर भाच्याने चौथे स्थान पटकावले. हे यश मिळवण्यासाठी दोघांनीही अनेक अडचणी, संघर्षाचा सामना करीत कठोर परिश्रम घेतले.

प्रतीक पारवेकर हा चार वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. आई मालती पारवेकर यांनी मुलाला राजेंद्र घुगे यांच्या गावी शिर्ला येथे आणले. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत आईने अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. मामा राजेंद्र घुगे यांनीही बालपणातच आई-वडिलांचे छत्र गमावले. केवळ सहा महिन्यांचा असताना पित्याचे निधन झाले.

घरी दोन एकर शेती. आयुष्यभर संषर्घ वाट्यालाच. मामा-भाच्याने सुरुवातीपासून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दोघांनीही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. मामा-भाच्याला आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. एकाच डब्यात दोघे विभागून जेवण करीत होते. अडतर प्रवासात सर्व अडचणींवर मात करीत प्रतीकने एससी प्रवर्गातून चौथा क्रमांक मिळवला असून, हे यश त्याने पहिल्याच प्रयत्नात प्राप्त केले, तर मामाने एससी प्रवर्गातून चौदाव्या क्रमांकाने यश मिळवले. निकाल जाहीर होताच दोघांचाही गावात सत्कार करण्यात आला.

परीक्षेसाठी घड्याळ व मुलाखतीसाठी कपड्यांचा अभाव

परीक्षेच्या वेळेस घड्याळ विकत घेण्यासाठी सुद्धा दोघांकडे पैसे नव्हते, तर मुलाखतीसाठी लागणारे कपडे देखील दोघांनी आळीपाळीने वापरले. राजेंद्रचे भाऊ आणि प्रतीकचे दुसरे मामा हेमंत घुगे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करीत दोघांनाही प्रेरणा दिली. प्रतीकची आई मालती पारवेकर यांनीही आयुष्यभर खस्ता खाऊन भाऊ व मुलाला खंबीर साथ दिली. दोघांच्याही यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.