नागपूर: मतदार यादीतील घोळाबाबत आरोप प्रत्यारोप अजूनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याच्या मतदार यादीत परस्पर फेरफार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात सात महिन्यापूर्वी केलेल्या तक्रारीवर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघातील आहे. या मतदारसंघात मतघोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वी सुद्धा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. मतघोटाळा झालाच नाही, असा दावा करणारे भाजप नेते या प्रकरणात आतापर्यत तरी मौन बाळगून आहे.

महाराष्ट्रात गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार करीत आहेत. मतदार नोंदणीत झालेल्या संशयास्पद वाढीच्या संदर्भात त्यांनी यापूर्वी कामठी विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले होते. निवडणूक आयोगाला यासंदर्भात काही प्रश्नही विचारले होते. पण आयोगाऐवजी भाजपनेच यावर खुलासा केला. प्रत्युत्तरादाखल राहुल गांधी यांच्यावरच टीका करीत त्यांना जनमताचा कौल अमान्य करीत असल्याचा आरोप केला. ज्यांच्या मतदारसंघाबाबत आरोप झाला तेथून भाजप नेते व विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. त्यांनीही सपशेल मतघोटाळ्याचा आरोप फेटाळून लावला होता व राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. जेंव्हा जेंव्हा मतदार यादी, मतदार नोंदणी, निवडणूक यंत्रणेवर आरोप झाले तेव्हा प्रत्येक वेळी भाजपने निवडणूक आयोग, अधिकारी यांची पाठराखण करीत आरोप कर्त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र आता नागपूर जिल्ह्यात उघड झालेला मतदार यादीतील घोटाळा हा थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. मतदाराचे नाव परस्पर दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात तिसऱ्याच व्यक्तीच्या अर्जावरून स्थलांतरित करण्यात आले. वर वर ही बाब निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्याच्या माध्यमातून झाल्याचे दिसून येते. मग प्रश्न उरतो तो अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव होता. कारण सत्ता महायुतीची होती. त्यामुळे आता या प्रकरणात भाजप कोणावर दोषारोपण करणार की यासाठी सुद्धा राहुल गांधी जबाबदार धरणार? असा सवाल काँग्रेसजणांनी केला आहे.

काय आहे प्रकरण ?

कामठी विधानसभा मतदारसंघातील कोराडी येथील मंगेश देशमुख यांचे नाव परस्पर हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची चौकशी झाली असता देशमुख यांचे नाव हिंगणा मतदारसंघात स्थानांतरित करण्यासाठी तिसऱ्याच व्क्तीने त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केला होता. अधिकाऱ्यानेही कुठलीही खातरजमा न करता तो अर्ज मंजूर केला. एकूणच ही बाब मतदार यादी तयार करणाऱ्या यंत्रणेच्या विश्वासालाच तडा देणारी ठरली आहे.