Premium

यवतमाळ : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे मनीष पाटील विजयी, भाजपा-शिंदे-पवार गटाच्या उमेदवारास केवळ सहा मते

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज सोमवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मनिष उत्तमराव पाटील विजयी झाले आहेत.

district bank president yavatmal
यवतमाळ : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे मनीष पाटील विजयी, भाजपा-शिंदे-पवार गटाच्या उमेदवारास केवळ सहा मते (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज सोमवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मनिष उत्तमराव पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार असलेले मनिष पाटील यांना १५, तर प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार राजुदास जाधव यांना केवळ सहा मते मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा बँकेतील समीकरणही बदलले. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर १ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. २१ सदस्यीय जिल्हा बँकेत काँग्रेसकडे सर्वाधिक नऊ संचालक आहेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे तीन आणि शिंदे गट, शरद पवार गट व अजित पवार गटासह अपक्ष असे प्रत्येकी दोन संचालक आहेत. भाजपाकडे अवघा एक संचालक असतानाही स्थानिक भाजपा नेत्यांनी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपा-शिंदे गट व अजित पवार गट या महायुतीचा उमेदवार बसविण्याचा चंग बांधला होता. यासाठी पालकमंत्री संजय राठोड, भाजपा आमदार मदन येरावार आणि राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी प्रचंड कष्ट घेतले.

हेही वाचा – “फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…

महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने त्यांचे संचालक फोडण्यासाठी अथक प्रयत्न केले गेले. मात्र काँग्रेस व शिवसेना (उबाठा) च्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे संचालक फुटू नये म्हणून दक्षता घेतली. त्याचा फायदा महाविकास आघाडीला आज झालेल्या निवडणुकीत दिसला. आज निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. महाविकास आघाडीकडून मनीष पाटील तर महायुतीकडून राजुदास जाधव या दोन उमेदवारांसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले. त्यात काँग्रेसचे मनिष पाटील १५ मते घेऊन विजयी झाले. तर महायुतीच्या राजुदास जाधव यांना अवघी सहा मते मिळाली. मनीष पाटील हे काँग्रेसचे दिवंगत खासदार उत्तमराव पाटील यांचे चिरंजीव आहेत.

हेही वाचा – वाढीव मालमत्‍ता कराच्या नोटीस पेटवल्या, करवाढीच्या विरोधात अमरावतीत कॉंग्रेसचा मोर्चा

मनीष पाटील यांनी यापूर्वी तब्बल १० वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. आता त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली. तर पराभूत झालेले राजुदास जाधव हे सेवानिवृत्त शिक्षक असून पालकमंत्री संजय राठोड यांचे समर्थक आहेत. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात भाजपा, शिवसेना अजूनही कच्ची असून महाविकास आघाडीच मजबूत असल्याचा संदेश या निवडणुकीमुळे मिळाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manish patil of mahavikas aghadi has won the post of district bank president nrp 78 ssb

First published on: 25-09-2023 at 17:22 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा