वर्धा : राज्यातील मराठी शाळेत पटसंख्येला लागलेली घरघर, त्यामुळे अतिरिक्त शिक्षकवर्ग, परिणामी बंद पडणाऱ्या मराठी शाळा यावर चिंता व्यक्त होत असून शिक्षक संघटना आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इव्हेंट सभागृहात विदर्भ शैक्षणिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर, आमदार सुधाकर अडबाले, राज्य मुख्याध्यापक संघाचे रावसाहेब आवारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, पटसंख्येचा निकष काहीही असो, हे सरकार राज्यातील एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही. शिक्षक व आम्हा सर्वांची काही जबाबदारी आहे. शाळा प्रवेश कार्यक्रमास मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत गेलो होतो. तेव्हा विद्यार्थी पाहून विचारले किती पटसंख्या आहे , तर मुख्याध्यापक म्हणाले अकराशे. थक्क झालो. तिथे उपस्थित एका अधिकाऱ्यांस विचारले की हे कसे शक्य झाले? तर तो अधिकारी म्हणाला, मुंबई महापालिकेच्या एकूण शाळांत आता विद्यार्थी संख्या अडीच लाखांवरून साडे तीन लाखांवर पोहचली आहे.
विविध उपक्रम, रंजक कार्यक्रम, शिकविण्याची हातोटी व अन्य प्रकारे पटसंख्या वाढविण्याचे विविध प्रयत्न झाले. ते यशस्वी झाले. असा दाखला देत डॉ. भोयर म्हणाले की केल्याने होत आहे … याचे हे उदाहरण. पटसंख्या कशी वाढेल, याची काळजी मुख्याध्यापक, शिक्षक, व्यवस्थापक यांनीच घेतली पाहिजे. अन्यथा माझ्यासह येथे उपस्थित सर्वांची मुले कॉन्व्हेन्टमध्ये आणि चिंता करायची मराठी शाळांची. असा टोला त्यांनी लगावताच हास्याचा धबधबा फुटला.
डॉ. भोयर पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवोदय विद्यालयाची बिघडलेली स्थिती पाहून त्या सर्व शाळा स्वतःच्या अख्तयारित घेतल्या. तसेच प्रोत्साहन म्हणून पीएम श्री शाळा योजना सुरू केली. त्याचाच कित्ता गिरवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएम श्री शाळा योजना प्रत्येक जिल्ह्यात लागू केली. पण सरकार प्रयत्न करीत असेल तर संबंधित घटकही पुढे आले पाहिजे. तरच या शाळा टिकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप यांच्या निस्पृह सेवेचा डॉ. भोयर यांनी आवर्जुन उल्लेख केला.
या शैक्षणिक संमेलनाच्या आयोजना मागची भूमिका सतीश जगताप यांनी मांडली. व्यासपीठावर शैक्षणिक प्रशिक्षण प्राचार्य मंगेश घोगरे, शत्रुघ्न बिडकर, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष केरूभाऊ ढोमसे व अन्य उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी कौतुक केलेल्या या संमेलनाच्या आयोजनात जिल्हा पदाधिकारी मिलिंद सालोडकर, प्रदीप गोमासे, मिलिंद मुळे, रविकिरण भोजने, वीरेंद्र मुळे, अनिल तडस यांनी सहकार्य केले.