नागपूर: नागपूरसह देशातील २२ एम्समध्ये शिक्षण, उपचार आणि वैद्यकीय संशोधनावर भर दिला जात आहे. नागपूर एम्सने मूत्रपिंड आणि अस्थी मज्जा प्रत्यारोपणावर चांगले काम केले. येथे लवकरच हृदय प्रत्यारोपण आणि काॅकलिअर इम्प्लांट सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेचा (एम्स) शनिवारी त्यांनी आढावा घेतला. त्यांनी एम्सच्या बाह्यरुग्ण विभागासह विविध भागांत भेटी दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भारती पवार म्हणाल्या, देशातील २२ पैकी ९ एम्समध्ये संचालकाचे रिक्त पद भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. येथे निकषाप्रमाणे अधिकारी मिळण्यात अडचण असल्याने हे पद रिक्त आहे.

हेही वाचा – अकोल्यात चक्क ‘पाकोळी’ पक्षांनी साकारली स्वतःची वसाहत, जाणून घ्या वैशिष्ट्ये…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णहिताला प्राधान्य देत प्रत्येक राज्यात एक एम्सचे उद्दिष्ट ठरविले आहे. सध्या सेवेतील २२ एम्समध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. सेवेत दाखल झाल्यापासून एकट्या नागपूर एम्समध्ये आतापर्यंत १२ लाख रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागाची सेवा घेतली. त्यापैकी ५ लाख रुग्ण २०२३ मधील आहेत. बऱ्याचदा येथील बाह्यरुग्ण विभागात दैनिक साडेतीन हजार रुग्ण नोंदवले गेले. आंतररुग्ण विभागातही आतापर्यंत ४३ हजार ९०३ रुग्णांनी उपचार घेतले. येथे आजपर्यंत १२ हून जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि २०० हून जास्त हिप आणि नी जाॅईंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. येथे ५ रुग्णांवर अस्थीमज्जा प्रत्यारोपणही झाले. लवकरच येथे ह्रदय प्रत्यारोपण आणि काॅकलिअर इम्प्लांट सुविधा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले. काॅकलिअर इम्प्लांटमुळे कर्णबधिर रुग्णांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात दीड लाख ‘वेलनेस सेंटर’

सध्या मधुमेह, उच्च रक्तदाबासह जीवनशैलीशी निगडीत आजाराचे रुग्ण वाढत आहेत. केंद्राने या रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार देशात दीड लाख वेलनेस सेंटर्स उभारण्यात आले आहेत. येथे ३० वर्षांवरील व्यक्तीची सक्तीने चाचणी केली जाईल. त्यात मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंड, हृदविकारासोबतच ओरल, ब्रेस्ट आणि सर्व्हायकल कर्करोग निदानाची सोय असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – गडचिरोली : विजेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू

टेलिमेडिसीनच्या मदतीने सेवा

एम्समधील डॉक्टर टेलिमेडिसीनच्या सहाय्यानेही दुर्गम भागात उपचार सल्ला देतात. नागपूर विभागातील ११ ग्रामीण रुग्णालये, ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २ उपजिल्हा रुग्णालये एम्सच्या टेलिमेडिसीन विभागाशी जोडली आहेत. या सेवेतून आजपर्यंत ७ हजार २५५ रुग्णांना सल्ला दिल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.

रुग्णाची माहिती एका क्लिकवर

देशातील सर्व शासकीय रुग्णालयांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडले जाणार आहे. त्यामुळे रुग्ण देशातील कोणत्याही शासकीय रुग्णालयात गेल्यास एका क्लिकवर त्याची सर्व माहिती संबंधित डॉक्टर बघू शकणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister bharti pawar reviewed aiims in nagpur find out what she said about heart transplants mnb 82 ssb