नागपूर : “मोंथा चक्रीवादळा”चे थैमान कायम असून त्याने आता विदर्भाकडे मोर्चा वळवला आहे. आंध्र प्रदेशपासून ओडिशापर्यंत “मोंथा” या चक्रीवादळाने थैमान घातले असतानाच आता त्याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पसरला आहे. कोकणातील समुद्रापासून ते थेट विदर्भापर्यंत वादळी वाऱ्यांचा कमीजास्त स्वरुपातील परिणाम दिसून येत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आता संमिश्र हवामान पाहायला मिळणार असून, किनारपट्टी भागामध्ये सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान खाते काय म्हणते..?
पूर्व विदर्भ आणि लगतच्या दक्षिण छत्तीसगडवर चांगले चिन्हांकित कमी दाबाचे क्षेत्र (तीव्र चक्रीवादळ वादळ “मोंथा” चे अवशेष) आज ३० ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८.३० वाजता उत्तर-वायव्येकडे सरकले आणि त्याच प्रदेशावर पसरले. पुढील २४ तासांत ते जवळजवळ उत्तरेकडे पूर्व मध्य प्रदेश आणि लगतच्या उत्तर छत्तीसगडकडे सरकण्याची आणि कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत होण्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा याठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
विदर्भात काय स्थिती आहे?
विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आली असून, उत्तर महाराष्ट्रासाठी पावसाचा “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. विदर्भात प्रामुख्याने अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा याठिकाणी पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस..?
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा कायम आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी कोकणकिनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी असू शकते. समुद्र खवळलेला असल्याने सध्या किनारपट्टी भागांसह मासेमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चार नोव्हेंबरपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण असून, हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
