MPSC Exam 2025 Date Schedule / नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २८ सप्टेंबरला राज्याच्या ३६ जिल्हा केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. एमपीएससीने अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर पहिल्यांदाच ही परीक्षा होणार आहे. मात्र, राज्यभर असलेल्या पूर परिस्थितीमुळे तूर्ताशी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह आता अनेक संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय नेते करत आहेत.

मात्र एमपीएससीने एक परिपत्रक जाहीर केले असून आयोग परीक्षा पुढे ढकलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. पुढील पाच दिवस राज्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अगोदर झालेल्या पावसामुळे या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील एका आठवड्यापासून पावसाने थैमान घातला आहे. त्यामुळे काही दिवस राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसह अनेक राजकीय व्यक्तींनी केली आहे. मात्र आयोगाने काढलेल्या परिपत्रकानुसार तूर्तास परीक्षा पुढे ढकलण्याची कुठली चिन्हे नसल्याचे दिसून येत आहे. या परिपत्रकामध्ये आयोगाने परीक्षा संदर्भात महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत त्या सूचना काय आहेत पहा.

एमपीएससीने काय कारण दिले ?

यासंदर्भात आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एमपीएससीकडून परीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे. तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. परीक्षा घेण्यास कुठलाही व्यक्ती येणार नाही तसेच परीक्षा ही प्रत्येक जिल्हा केंद्रावर होणार असल्याने विद्यार्थ्यांना पोहोचणे शक्य होणार आहे. यासाठी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रावर पोचून सुरळीत परीक्षा द्यावी असे सांगत त्यांनी सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

असे आहे आयोगाचे परिपत्रक –

(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन मुद्रित केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

(२) उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे” काळजीपूर्वक अवलोकन करावे.

(३) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.

(४) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.

(५) परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही.

(६) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही.

(७) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

(८) पडताळणी/तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी/तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल.

(९) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.

(१०) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

(११) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.

(१२) कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची (Debar) तसेच प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.