नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमागे या मार्गावर थांबे नसणे हेसुद्धा एक कारण आहे. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात वेढकाढूपणा सुरू आहे. एका खासगी कंपनीने या सुविधा पुरवठय़ाबाबत दिलेला प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरुवातीला स्वीकारून नंतर तो रद्द केल्याने या कामाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या समृद्धीत भर घालणारा महामार्ग म्हणून ‘समृद्धी’ची प्रसिद्धी केली जात असली तरी लोकार्पणापासूनच या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. महामार्गावर एकही थांबा नसणे, त्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावणे, टायर फुटणे यासह तत्सम बाबींमुळे अपघात होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच रस्त्यालगत थांबे, उपाहारगृहे आणि अन्य सुविधांची उभारणी तातडीने करावी, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. मात्र, अद्याप ही प्रक्रिया निविदा काढण्याच्या पलीकडे गेलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जीएचव्ही शिव अॅण्ड पार्क’ या अंधेरीच्या कंपनीने ‘एसएसआरडीसी’ला २ मार्च २०२३ मध्ये सुविधा उभारणी संदर्भातील प्रस्ताव दिला होता. तो महामंडळाने स्वीकारला होता. तसे पत्रही कंपनीला दिले होते. मात्र, १० जुलैला महामंडळाने कंपनीला प्रस्ताव स्वीकारण्याचे पत्र रद्द केल्याचे कळवले आणि या कामासाठी पुन्हा निविदा काढली. यापूर्वीही याच कामासाठी महामंडळाने अनेक वेळा निविदा काढल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता पुन्हा तीच प्रक्रिया राबवली जात आहे. सुविधा उपलब्धतेसाठी कंत्राटदार कंपनीला लागणारा वेळ लक्षात घेता ही कामे तातडीने करणे आवश्यक आहे. मात्र, महामंडळाचे घोडे अद्याच निविदेवरच अडले आहेत.

याबाबत सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुख्य महाव्यवस्थापक (भूमी व सर्वेक्षण) डॉ. भरत बास्टेवाड यांनी ही धोरणात्मक बाब असल्याचे सांगून काहीही बोलण्यास नकार दिला.

आतापर्यंत १०६ मृत्युमुखी

समृद्धी मार्गावर डिसेंबर २०२२ ते ७ जुलै २०२३ यादरम्यान एकूण ५१ प्राणांतिक अपघात झाले. त्यात १०६ जणांचा मृत्यू झाला. १ जुलैला खासगी बसला झालेल्या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrdc indifferent about facilities on smriddhi highyway amy