नागपूर: एसटी महामंडळाने राज्यभरातील सर्व विभागांमध्ये कार्यरत शेकडो चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची मोठी मोहिम राबवली. त्यात मद्यपान केल्याचे आढळलेल्या सात कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला. या मोहिमेबाबत आपण जाणून घेऊ या.
एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता खात्याने २८ ऑक्टोंबर रोजी राज्यभरातील सर्व विभागांमध्ये कार्यरत असलेले चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची एक मोठी आणि अचानक मोहीम राबविली. त्यात संशयास्पद एकूण ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक कर्मचारी अशा सुमारे १७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी केली गेली. त्यात मद्यपान केल्याचे दोषी आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित कर्मचारी या व्यापक तपासणी मोहिमेदरम्यान, कर्तव्य बजावत असताना मद्यपान केल्याचे आढळून आले . त्यामध्ये १ चालक आणि ४ यांत्रिक कर्मचाऱ्यांसह एकूण ७ कर्मचारी निलंबित झाले आहेत.
मद्यपानाच्या तक्रारी…
एसटी ही महाराष्ट्राची ‘ लोकवाहिनी ‘ आहे . दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात. त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याला तातडीने मोहीम राबवून अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई केली गेली.
कर्मचारी कोणत्या भागातील…
– धुळे विभागाच्या तपासणीत एक यांत्रिक कर्मचारी, एक स्वच्छक आणि एक चालक मद्यपान करताना आढळले.
– नाशिक येथे तपासणी केलेल्यांमध्ये एक चालक दोषी आढळला.
– परभणी आणि भंडारा विभागांत प्रत्येकी एक यांत्रिक कर्मचारी मद्याच्या अमलाखाली काम करताना आढळला.
– नांदेड विभागामध्ये तपासणीत एक वाहक मद्यपान केलेला आढळला.
नवीन एसटी बस मध्ये ‘ब्रेथ ॲनलायझर‘
प्रवाशांची सुरक्षा ही एसटी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भविष्यात नवीन येणाऱ्या बसेस मध्ये चालकाच्या समोर ब्रेथ ॲनालिसिस यंत्र (अल्कोहोल तपासणीसाठी) बसविण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या मद्यपी चालकांना अटकाव होईल. अर्थात, या कारवाईमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गैरव्यवहारांना आळा बसेल, असे संकेत परिवहन खात्याकडून दिले गेले.
