नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनावर आंदोलक ठाम आहे. या विषयावर बच्चू कडू यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्त आणि नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षकांना निवेदन देत सांगितले की, शेतकरी हक्कांसाठी बोलल्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा. कडू यांनी न्यायालयाबाबतही महत्वाचे विधान केले.

वर्धा मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्वत: दखल घेतली.न्यायालयाने तातडीचे आदेश देत माजी आमदार बच्चू कडू यांना व त्यांच्या समर्थकांना लगेच रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिले. त्यावर बच्चू कडू यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्त आणि नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षकाला निवेदन देत सांगितले की, आम्ही न्यायालयाचा आदर करतो, आम्हाला शेतकरी हक्कांसाठी बोलल्याबद्दल गुन्हा नोंदवून अटक करावी व जेलमध्ये टाकावे आणि रस्ता मोकळा करून घ्यावा.

शेतकऱ्यांच्या जीवन हक्कांसाठी, जगण्याचे व जिवंत राहण्याचे प्रश्न घेऊन अन्ननिर्माता शेतकरी रस्त्यावर उतरला तर त्यांनी ‘रस्ता अडवला’ असे म्हणत माननीय उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन बेंचने स्वतःहून वृत्तपत्रे वाचून गंभीर दखल घेतली याबाबत न्यायालयाचे आभार. ३१ वर्षांपूर्वी पहिली शेतकरी आत्महत्या झाली तेव्हा अशी स्वतःहून दखल एखाद्या कोर्टाने दखल घ्यायला पाहिले होती, शेतकऱ्यांनी कर्जापायी हैराण होऊन अनेक आत्महत्या केल्या त्या लाखो झाल्या तेव्हाही स्वतःहून दखल घ्यायला हवी होती, शेतकर्याना मदत करणाऱ्या अपुऱ्या योजना असतात व बजेटमध्ये तरतूद नसते तेव्हा कुणीतरी स्वतःहून दखल घ्यायला हवी होती.

शहरातल्या लोकांच्या जीवनाला त्रास झाला की सगळे जागे होतात. शहरी लोक आणि शेतकरी हा भेदभाव नसावा, ही विषमता नसावी. आम्ही न्यायालयाचा आदर करतो त्यामुळे हे लेखी पत्र देऊन सांगू इच्छितो की, पोलिसांनी रस्ता मोकळा करून घ्यावा. आम्ही शेतकरी आंदोलनातील सगळे जण सहकार्य करायला तयार आहोत. आमच्यावर गुन्हे नोंदवावे आणि आम्हाला पोलिसांनी त्वरित येथून त्यांच्या गाड्यांमधून जेलमध्ये घेऊन जावे. जर पोलीस गाड्यांची व्यवस्था नसेल तर आम्हाला पायी न्यावे पण गुन्हे नोंदवून जेलमध्ये न्यावे आणि रस्ता मोकळा करून घ्यावा. आमच्या या पत्रावर पोलिसांनी त्वरित लेखी उत्तर द्यावे आणि रस्त्यावरील आंदोलन संपवून, रस्ता मोकळा करून घ्यावा ही विनंती, असेही कडू यांनी निवेदनात पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना म्हटले.