नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी सुरू केलेले आंदोलन आता तापले आहे. आंदोलकांनी नागपुरात चक्काजाम केल्याने वाहतूक कोंडी होऊन या मार्गावरील एसटीच्या सर्व वाहतूक ठप्प पडल्या आहे. या महामार्गावरून मंगळारी प्रवाश्यांना घेऊन निघालेल्या २० बस अडकून असून त्यातील ८०० प्रवाश्यांचे काय झाले? याबाबत आपण जाणून घेऊ या.

दिवाळीनिमित्त दिल्ली, मुंबई, पुणेसह देश व राज्यातील विविध भागात नोकरी, व्यवसायासह इतर कामासाठी राहणारे नागपुरकर मोठ्या संख्येने कुटुंबासोबत सन साजरा करण्यासाठी उपराजधानीत परतले होते. तर भाऊबीजनिमित्तही अनेक जणांची नागपूर गाठले होते. दिवाळी संपताच आता नागपुरातून देशाच्या वेगवेगळ्या भागात परतणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. त्यापैकी अनेक प्रवासी एसटी बसने जातात. त्यामुळे एसटी बसमध्ये सध्या प्रवाश्यांची संख्या वाढली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले आहे.

आंदोलनकांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे. परिणामी या भागात वाहतुक ठप्प पडली आहे. दरम्यान मंगळवारी एसटीच्या सुमारे २० प्रवासी बसेस प्रत्येकी ४० प्रवासी घेऊन चंद्रपूर, वर्धासह या मार्गावरून निघाल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे या बसेस तेथेच अडकल्या. त्यामुळे या बसमधील प्रवाश्यांची दमछाक झाली. बरेच तास वाहतुक कोंडी सुटत नसल्याचे बघत शेवटी प्रवाश्यांनी स्वत:चे सामान घेऊन पायपीट करून दोन ते तीन किलोमिटर प्रवास करून मिळेल ते वाहनाने निश्चित स्थळ गाठले. ही स्थिती बुधवारीरीही कायम होती. बसमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये नागपुरात उपचाराला आलेल्या बऱ्याच रुग्णांचाही समावेश असल्याची माहिती नातेवाईकांकडून दिली गेली.

एसटी महामंडळाला कितीचा फटका ?

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झालेल्या वर्धा मार्गासह इतरही चार महामार्गावर सुमारे २० एसटीच्या प्रवासी बसेस अडकून पडल्या आहे. त्यामुळे एसटीच्या मंगळवारी या एकाच दिवशी ६६ फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे नागपूरहून निघणाऱ्या बसेस ६ हजार ६९३ किलोमिटर जाऊ शकल्या नाही. तर एसटी महामंडळाला सुमारे ४ लाख २१ हजार रुपयांचा एका दिवसात फटका बसला. हे नुकसान दुसऱ्या दिवशी बुधवारी त्याहून जास्त राहण्याचे संकेत एसटीकडून दिले गेले.