नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी मंगळवारी (२९ ऑक्टोबर) सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका आता विविध वस्तूंच्या पुरवठ्यालाही बसत आहे. आंदोलनामुळे झालेल्या वाहन कोंडीमुळे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना पेट्रोल, डिझेलसह इतर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पुरवठ्याची स्थिती लवकर सुधारली नाही, तर जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप कोरडे पडण्याची शक्यता पेट्रोल पंप चालकांनी व्यक्त केली आहे.

नागपूरातील शहरी भागात सध्या सुमारे १०५ आणि ग्रामीण भागात सुमारे ९०, असे एकूण २९० च्या जवळपास वेगवेगळ्या कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी शहरी भागात रोज सुमारे १० लाख लिटर पेट्रोल आणि ५ लाख लिटर डिझेलची गरज भासते. नागपूर जिल्ह्यात सध्या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल पंपांना बोरखेडी येथील डेपोतून इंधनाचा पुरवठा होतो, तर वर्ध्यातील नायरा कंपनीच्या डेपोतून इंडियन ऑइल आणि एचपीसीएल या कंपन्यांच्या पेट्रोल पंपांना पुरवठा केला जातो.

या डेपोतून निघालेले इंधनाचे टँकर वर्धा मार्गावरून येतात. परंतु शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वर्धा रोडवर वाहतूक कोंडी झाल्याने अनेक टँकर मार्गातच अडकले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. नागपुरात रोज पुरवठा होणाऱ्या साठ्याच्या तुलनेत आंदोलनामुळे केवळ २५ टक्के पुरवठा होत आहे. त्यामुळे येत्या काही तासांत शहरातील काही पेट्रोल पंप कोरडे पडण्याची शक्यता आहे. आंदोलनावर लवकर तोडगा न निघाल्यास हळूहळू एकेक करून पेट्रोल पंप कोरडे पडल्यास नागपूरकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे म्हणणे

नागपूर जिल्ह्यातील वर्धा मार्गावर बहुतांश कंपन्यांचे पेट्रोल आणि डिझेलचे डेपो आहेत. या डेपोतून रोज नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना इंधन पुरवठा केला जातो. परंतु शेतकरी आंदोलनामुळे या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सध्या पूर्वीच्या तुलनेत रोज केवळ २५ ते ३० टक्के इंधन पुरवठा होत आहे.पेट्रोल पंप चालक सध्या सुरू असलेल्या मार्गावरून टँकर काढून कसातरी इंधन मिळवून पंप सुरू ठेवत आहेत. परंतु त्यापैकी काही मार्ग स्थानिक आंदोलकांकडून बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.आगामी काळात इंधनाची कमतरता भासू नये म्हणून प्रशासनाने पेट्रोल, डिझेलसह इतर इंधनासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल्यास पुरवठा सुरळीत राहील आणि कुणालाही त्रास होणार नाही, अशी माहिती विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अमित गुप्ता यांनी दिली.