नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. प्रत्यक्ष कर अकादमीच्या नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी खासगी सचिव (पीएस) हे चहा पेक्षा केटली गरम असून एकदा त्यांनी कशा पद्धतीने रेल्वे गाडीचे स्थानकावरील फलाट बदलून घेतले. त्याबाबत माहिती दिली.

गडकरी म्हणाले, अनेकदा मंत्री कठोर मर्यादा ओलांडून निर्णय घेतात, पण हल्ली ‘चहापेक्षा किटली गरम’ अशीही उदाहरणे आहेत. काही ठिकाणी मंत्र्यांपेक्षा त्यांचे पीएस (खासगी सचिव) भारी असतात. माझ्या अपघातानंतर मला रेल्वे गाडीने जायचे होते. मला चालायला समस्या होती. रेल्वे स्टेशनवर मला गाडी दुसऱ्या फलाटावर आल्याचे कळले. तिथे बरेच अधिकारीही उपस्थित होते. त्यांना मी रेल्वे गाडीचे फलाट का बदलले, याबाबत विचारणा केली. त्यांनी मला आपल्यासाठी बदलल्याचे सांगितले. त्यावर मी कुणी माहिती दिल्याचे विचारले. त्यांनी आपल्या पीएसने कळावल्याचे सांगितले. त्यावर मी संबंधित पीएसला रागावून असे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. या पद्धतीने चुकीचे काम करणे योग्य नसल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.

बायकोपेक्षा फाईलवर अधिक प्रेम….

अनेक अधिकारी निर्णय घेणे कसे टाळतात आणि यामुळे विकास प्रकल्पांना कसा विलंब होतो, यावर गडकरी यांनी रोखठोक भाष्य केले. एका अधिकाऱ्याचा किस्सा सांगत त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, अनेक अधिकारी कुठल्याही बाबतीत निर्णय घेणे टाळतात. प्रसंगी आपल्या बायकोपेक्षा त्यांचे फाईलवर अधिक प्रेम असते. तीन- तीन महिने त्यांच्याकडे आलेली फाईल दाबून ठेवतात.

कर्जबाजारी कंत्राटदारांचे दुःख अधिकाऱ्यांना कळत नाही

महिन्याच्या एक तारखेला पगार मिळणाऱ्याला तीन महिने फाईल मंजूर न झाल्याने समोरच्या व्यक्तीला (कंत्राटदार) व्याजावर व्याज भरावे लागते. अशा कामचुकार अधिकाऱ्यांना कर्जबाजारी कंत्राटदाराचे दुःख कळत नाही, असे गडकरी म्हणाले.

चौकशी करा, धाडी घाला, पण निर्णय घ्या…

नितीन गडकरी म्हणाले, अधिकाऱ्यांनी काही अनुचित असल्यास चौकशी करावी, धाडी घालाव्या, मात्र एकदाच कोणत्याही प्रकल्प वा प्रस्तावावर ‘होय’ किंवा ‘नाही’ असा ठोस निर्णय घ्या. उगीच कुणाला वेठीस धरू नका. अनेक प्रकल्प केवळ याच कारणांमुळे रखडतात, अशी खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

व्यवहारी ज्ञान महत्वाचे…

विविध विभागात अनेक अधिकारी आपल्या कामावर आणि प्रामाणिकतेवर मोठे होतात. कामात अहंकार योग्य नाही. गडकरींनी अधिकाऱ्यांना चांगले निर्णयक्षम अधिकारी होण्याचा सल्ला दिला आणि ज्ञानासोबतच व्यवहारी ज्ञान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.