गोंदिया : ७ जूनपासून मृग नक्षत्र लागल्यानंतर पावसाळा सुरू होतो. पावसाळ्यात वन्यजीवांचा प्रजनन काळ राहत असल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प १५ जून पासून पर्यटनासाठी बंद केला जातो. यंदा मात्र पाऊस लांबल्याने वन विभागा कडून मुदतवाढ देण्यात आली असून, आता व्याघ्र प्रकल्प ३० जून पासून पर्यटनासाठी बंद केला जाणार आहे. १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळाल्याने वन्यजीवप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी’ ठरली असून, आता ३० जूनपर्यंत प्रकल्प पर्यटनासाठी खुला राहणार आहे.

माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी, आज मोकळा श्वास घेण्यासाठी मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. परिणामी, आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज भासत आहे. यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्याची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वनपर्यटनाकडे दिसत आहे.

गोंदिया भंडारा जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून, येथे वाघोबाच्या दर्शनासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. जिल्हा व राज्यातीलच नव्हे तर परराज्य व विदेशी पर्यटकसुद्धा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येत आहेत. मात्र, आता पावसाळा सुरू झाला असून, पावसाळा म्हणजे वन्यजीवांचा प्रजननाचा काळ असतो. शिवाय, पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाकडून पर्यटन बंद केले जाते. त्यानुसार, दरवर्षी १५ जून पासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद केले जात होते. यंदा मात्र अद्याप पावसाने हजेरी लावली नसल्याने वन विभागाने यंदा ३० जूनपर्यंत वाढ दिली आहे. यामुळे पर्यटकांना अतिरिक्त १५ दिवस मिळाले असून, या कालावधीत पर्यटन करता येणार आहे.

ऑनलाइन-ऑफलाइन सुविधा राहणार

आतापर्यंत १५ जून रोजी पर्यटन बंद केल्यानंतर ३० जूनपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध राहत होती. यंदा मात्र ३० जूनपर्यंत पर्यटनाला वाढ देण्यात आली असून, आता ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत पाऊस बरसलेला नसून वन्यजीवांचे दर्शन पर्यटकांना होत असल्यामुळे पर्यटकांची गर्दी व्याघ्र प्रकल्पात दिसून येत आहे. आता अतिरिक्त १५ दिवस मिळाल्याने पर्यटकांमध्ये आनंद आहे.

१५,२०७ पर्यटकांनी केली जंगल सफारी

जंगल सफारीसाठी उन्हाळा महत्त्वाचा मानला जात असला तरी पर्यटकांना जंगल सफारीसाठी ठरावीक कालावधी लागत नाही. हेच कारण आहे की, वर्षभर पर्यटक नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात १५ हजार २०७ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. त्यात आता पूर्ण जून महिना त्यांना मिळणार असल्याने पर्यटकांची संख्या आणखी वाढणार यात शंका नाही. वन विभागाला या पर्यटकांकडून ४३ लाख ७१ हजार २९० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.