वर्धा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या शुक्रवार रोजी आयोजित सभेसाठी येणार आहेत. हिंगणघाट येथे पक्षाचे उमेदवार अतुल वांदिले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते हजर होतील तेव्हा नेहमीचे चेहरे त्यांना दिसणार नाहीत. कारण तिकीट वाटपवरून घडलेल्या घडामोडी. पक्षात दोन वर्षांपूर्वी आलेल्या वांदिले यांना तिकीट दिल्याने असंतोष उसळला. माजी आमदार राजू तिमांडे व बलाढ्य सहकार नेते सुधीर कोठारी यांनी सभा घेत नाराजी व्यक्त केली. लगेच तिमांडे यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला. कोठारी त्यांच्या मदतीस आले. आणि राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला. हे सर्व १९९९ च्या पक्ष स्थापनेपासून ते आता फूट पडल्यानंतर राहलेल्या शरद पवार यांच्या पक्षासोबत निष्ठा ठेवून राहले. इतर पक्षातून आलेल्याची कदर व आम्ही बेदखल अशी या पवार निष्ठावंत राहलेल्यांची भावना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोठारी यांचे मतदारसंघात बाजार समित्या, सहकार बँका, विविध सोसायट्या या माध्यमातून मोठे जाळे विस्तारले आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे मधुर संबंध असल्याचे लपून नाही. भाजप आमदार समीर कुणावार यांनी पण समुद्रपूर बाजार समितीत कोठारी यांना मदत करीत आपले कार्यकर्ते संचालक केले. म्हणून कोठारी यांना हिंगणघाटचे शरद पवार म्हणून गंमतीत म्हटल्या जाते. असे हे कोठारी अजित पवार यांच्या अधिक नजीकचे असूनही ते शरद पवार सोबतच राहले. त्यांनाही पक्षाने तिकीट नाकारले व ते तिमांडे सोबत गेल्याने पक्ष एकहाती वांदिले कडे आला. पण हिंगणघाट येथे ५ वेळा येऊन गेलेल्या पवारांना आता उद्याच्या दौऱ्यात एकही जाणता जूना चेहरा स्वागतास दिसणार नाही. कोठारी म्हणाले की पवारांच्या सभेस जाणे शक्य नाही कारण आम्ही आमचा उमेदवार उभा केला आहे. अधिक बोलणे त्यांनी टाळले. या सभेत कोठारी यांनी उपस्थित रहावे म्हणून काही हालचाली झाल्या. पण त्यास कोठारी यांनी दाद दिली नाही, असे समजले. पवार हे नव्या चिन्हासह पुढे निघाले, तशीच स्थिती आज हिंगणघाट येथे दिसून येते. पण चर्चा हीच की हिंगणघाटला शरद पवार यांच्या स्वागतास हिंगणघाटचे शरद पवार दिसणार नाही, याचीच.

हेही वाचा : अखेर काँग्रेसनेही घेतला कठोर निर्णय…माजी मंत्र्यांसह तब्बल सहा…

तसेच उमेदवार वांदिले हे तिमांडे व कोठारी यांचे आव्हान झेलत ही सभा कशी यशस्वी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काहीच महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत हिंगणघाट येथे झालेल्या सभेत शरद पवार यांच्या सभेत कोठारी, तिमांडे व वांदिले हे एकत्रित पुढे होते, हे आठवून दिल्या जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader sharad pawar rally in hinganghat sudhir kothari and raju timande will remain absent pmd 64 css