नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत” या संकल्पनेला पूरक ठरणाऱ्या इव्हिएशन सेक्टरमध्ये प्रचंड संधी असून, त्याचा फायदा नागपूर शहराला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. “रोल ऑफ एव्हिएशन इन विकसित भारत” या विषयावर नागपूर येथील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, “इव्हिएशन सेक्टर हा देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नागपूर शहर हे भारताच्या झिरो माईलवर स्थित असल्याने, येथून देशातील सर्व प्रमुख शहरांपर्यंतचे अंतर जवळपास समान आहे. ही भौगोलिक स्थिती नागपूरला एक राष्ट्रीय एअर ट्रॅफिक कंट्रोल ग्रिट बनवू शकते.”
ते पुढे म्हणाले की, भविष्यात देशभरातील अनेक विमानतळांचे नियंत्रण आणि देखरेख नागपूरमधूनच होऊ शकते. अनेक आंतरराष्ट्रीय एबीसी कंपन्यांची केंद्रे येथे स्थापन होतील आणि त्यांना भारतभर काम करणे सोयीचे जाईल.
गडकरी यांनी हेही नमूद केले की, भारतात सध्या ७५ विमानतळांवरून १५० विमानतळांपर्यंत झपाट्याने वाढ झाली आहे. एअर बेस्ड कॅरियर डिमांड मध्येही २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. “हेलिकॉप्टर एव्हिएशन हे सध्या देशातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे,” असे ते म्हणाले.
तसेच, इंधनाच्या बाबतीतही नाविन्यपूर्ण बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले. “पेट्रोलियम फ्युएलमध्ये ५% बायोफ्युएल मिसळण्याच्या कल्पनेवर जागतिक स्तरावर चर्चा सुरू आहे. याचा थेट फायदा भारतातील शेतकऱ्यांना होईल,” असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एव्हिएशन क्षेत्रातील कंपन्यांना असेच पुढे येत राहावे. त्यांनी पुढाकार घेऊन या क्षेत्रात गुंतवणूक करावी आणि विकसित भारताच्या स्वप्नात भागीदार व्हावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.