नागपूर : सरकार निकम्मी आहे, चहा पेक्षा केटली गरम, लोकांना फुकट काही देऊ नका, अशी बेधडक, रोखठोक वक्तव्ये करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कायम चर्चेत असतात. जाहीर कार्यक्रमांमध्ये बोचरी टीका करत अनेकांची फिरकी देखील ते घेत असतात. रविवारी उच्च न्यायालयाचे न्या. अनिल किलोर खुद्द व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांनी असाच किस्सा जाहीरपणे सांगितला आणि सभागृहात एकच कुजबूज सुरू झाली.
समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ समाजसेवी दाम्पत्य डॉ. सतिश गोगुलवार, डॉ. शुभदा देशमुख, अलिकडेच झालेल्या विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत ग्रॅडमास्टर ठरलेली नागपुरातील बुद्धीबळाची राणी दिव्या देशमुख, ज्येष्ठ संपादक बाळासाहेब कुळकर्णी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा सार्थक फाऊंडेशनच्या वतीने वनामतीच्या सभागृहात कौटुंबिक सत्कार सोहोळा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर न्या. अनिल किलोर, माजी मंत्री रमेश बंग, आमदार संजय मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
चांगल्या लोकांच्या समर्थनासाठी पुढे येण्यातच जीवनाचे सार्थक आहे, असे नमूद करीत केंद्रिय मंत्री गडकरी पुढे म्हणाले, आजचा सत्कार सोहोळा हा नुसता कार्यक्रम नाही, तर चांगले काम करणाऱ्यांची समाजाने घेतलेली दखल आहे. सार्थकने अशा लोकांचा सत्कार सोहळा आयोजित केल्याने कार्यक्रमाचे आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याचे समाधान आहे.
सकारात्मक कार्याची मिळते ऊर्जा
यावेळी न्या. किलोर म्हणाले, वैद्यकीय शिक्षणानंतर डॉ. सतिश गोगुलवार यांनी गलेलठ्ठ पगार अथवा एखादा दवाखाना टाकून एश्वर्य उपभोगता आले असते. पण जयप्रकाश नारायण यांचा सहवास लाभलेल्या डॉ. गोगुलवार यांनी हे एश्वर्य लाथाडत गडचिरोलीतल्या कुरखेडा येथून समाजाचे ऋण फेडण्याचा वसा घेतला. त्यामुळे सार्थक फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्याला विशेष महत्व आहे. कारण ही अशा सेवेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या समाजातल्या प्रत्येक घटकाचा देखील हा सत्कार आहे. यातून सकारात्मक कार्याची उर्जा मिळते. हल्ली कार्यक्रम कोणता आणि काय बोलायचे याचे भान अनेकांना नसते. पण हा सत्कार सोहळा त्यालाही अपवाद ठरला आहे.
नेमके काय म्हणाले गडकरी
हल्ली मी सत्कार सोहळ्याला फारसा उपस्थित रहात नाही. कारण सत्कार म्हटले, की मला एक जुना किस्सा आठवतो. तो म्हणजी मी एकदा कामानिमित्त महालमधून जात होते. त्यावेळी मला एक मित्र भेटला. त्याच्या हातात हार होता. तो पाहून मी त्याला सहज विचारले का, रे कुठे निघालायस घाई घाईने. त्यावर तो म्हणाला, आमच्या संस्था अध्यक्षाचा आज वाढदिवस आहे. त्याच्या मढ्यावर हार घालायला चाललोय. निदान त्यामुळे तरी माझी संस्थेत नोकरी पर्मनंट होईल. त्याचे हे उत्तर एकून मला चकित करून गेले. तेव्हा पासून सत्कार सोहळे म्हटले, की मला हा किस्सा आठवतो, असेही गडकरींनी विशेष नमूद केले.