चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विचारांच्या लढाईत शरद पवारांनी महाविकास आघाडीसोबत राहावे व ते राहतील. मात्र तरीही पवारांच्या हालचालींवर काँग्रेस पक्ष लक्ष ठेवून आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते तथा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार डॉ. नितीन राऊत यांनी दिली. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे, तेव्हा पक्षातील सर्वांनी हेवेदावे विसरून काम करावे अशी सूचना त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक विश्राम भवनात निरीक्षक मुनिज पठाण, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, महिला अध्यक्ष वैरागडे, विनोद दत्तात्रे, नंदू नागरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत डॉ. राऊत यांनी शरद पवार यांच्या भूमिकेमुळे राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते असेही म्हटले. पवार यांनी परिवार वेगळा व राजकारण वेगळे अशा पद्धतीने काम करावे. विचारांच्या लढाईत पवार महविकास आघाडीसोबत राहतील तसेच त्यांनी इंडिया आघाडीला मजबुती प्रदान करावी. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष मजबूत आहे. निरीक्षक म्हणून आज दिवसभर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांतील अध्यक्षांकडून आढावा घेतला. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार यांनी बैठकीला हजेरी लावून त्यांच्या क्षेत्रातील माहिती दिली. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी येथे पाठविले आहे. लोकसभा क्षेत्रात संघटन बांधणी, बूथ समिती नियोजन, स्थानिक प्रश्नांवर चळवळी, ज्या बूथवर काँग्रेस पक्ष मागे आहे तेथे कशा पद्धतीने नियोजन करता येईल याची माहिती जाणून घेतली. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला, त्यावर चर्चा केली. गाव अध्यक्ष, शहर, महापालिका येथे वॉर्ड अध्यक्ष करा अशा सूचना दिल्या आहेत. ही प्राथमिक भेट होती, पूर्ण माहिती जाणून घेतली, दुसऱ्या टप्प्यात विधानसभा क्षेत्राचा दौरा करणार आहे. त्यानंतर पक्ष श्रेष्ठींकडे अहवाल सादर करणार असल्याचेही सांगितले. येत्या सात दिवसांत प्राथमिक अहवाल पाठविला जाईल.

हेही वाचा – वनरक्षकांना मृतदेह कुजल्याचा वास आला, झाडांच्या फांद्या हटवताच जे दिसले..

हेही वाचा – नागपुरात वाहतूक नियम मोडणाऱ्या ३ हजार वाहन चालकांवर कारवाई

वडेट्टीवारांमुळे विदर्भात काँग्रेसची शक्ती वाढली

राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात तसेच विदर्भात काँग्रेस पक्षाची शक्ती वाढली आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष विदर्भात जोरदार मुसंडी मारणार आहे, असेही राऊत म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin raut comments on sharad pawar says congress is keeping an eye on pawar movements rsj 74 ssb