वर्धा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल आज निवडणूक आयोगाने फुंकला. बऱ्याच काळ प्रलंबित राहलेल्या या निवडणुका आज जाहीर झाल्याने अनेकांच्या नेतेपदाच्या उर्मी प्रबळ झाल्याचे आज बघायला मिळाले. संभाव्य नगरपिते आनंदित झाले. त्यातच पक्षीय माहोल उत्साही झाला. भाजपने निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच काही कार्यक्रम आखून ठेवला होता. त्यातील एक व पहिला टप्पा म्हणजे पक्षांतर्गत निवडणूक.
नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक असल्याने अनेक इच्छुकांची भाऊगर्दी होणार, हे निश्चित. त्यामुळे गटबाजी वाढणार, हे पण पक्के असल्याने भाजपने एक फंडा काढल्याचे म्हटल्या जात आहे. भाजपतर्फे लढण्यास जे ईच्छुक आहे त्यांची निवड पक्षीय मतदानतून घेण्याचे ठरले. आज तशी निवडणूक हेरिटेज सभागृहात घेण्यात आली. यासाठी पक्षनेते प्रदेश भाजप उपाध्यक्ष संजय भेंडे हे निवडणूक निरीक्षक म्हणून हजर झाले होते. त्यांच्या उपस्थितीत मतदान पार पडले. सायंकाळी आज ही प्रक्रिया पूर्ण झाली.
या आजच्या उपक्रमात भाजपचे शहर अध्यक्ष नीलेश किटे, माजी पालिका उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, नीलेश पोहेकार, वंदना भुते, शेरा भाटिया व प्रशांत बुरले यांनी दावेदारी केली. त्यांच्याबाबत शहर कार्यकारिणी व अन्य सेल पदाधिकारी यांची मते निरीक्षकांनी समजून घेतली. कोणास कौल मिळाला हे मात्र गुलदस्त्यात आहे. बंद लिफाफा मुंबईत उघडणार असे सांगण्यात आले.
मात्र या संभाव्य भाजप उमेदवारांचा जीव टांगणीस लागल्याचे चित्र दिसून आले. किटे, ठाकूर, बुरले यांना पक्षात रेस के घोडे म्हणून ओळखल्या जाते. वर्धा पालिका अध्यक्षपद यावेळी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. तसेच या निवडीत पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांचा वरचष्मा राहणार. ठाकूर यांनी आपली दावेदारी आधीच जाहीर केली आहे.
अनेक वर्ष नगरसेवक तसेच काही काळ उपाध्यक्ष राहलेले ठाकूर मी कुठे कमी असा प्रश्न विचारून प्रतिसाद चाचपडत आहे. रामनगर हा त्यांचा बालेकिल्ला व त्याच परिसराची प्रलंबित लिज धारकांची समस्या आज मार्गी लागल्याने त्यांनी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या स्वागताचा जय्यत कार्यक्रम ठेवला आहे. किट हे संभाव्य दुसरे उमेदवार तर पालकमंत्र्यांच्या अती विश्वासातील समजल्या जातात. त्यांना पण उमेदवारी मिळण्याची खात्री आहे. जातीय समीकरण ठेवून बुरले यांचे पण नाव चर्चेत आहेच. पण या सर्वांविषयी आज कोणी काय मते व्यक्त केली, ती बाब गोपनीय असल्याने उत्सुकता वाढली.
