अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने स्वबळाचा सूर आळवला. अकोला व वाशीम जिल्ह्यात रिसोडचा अपवाद वगळता महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिलेत. काँग्रेसने अकोला जिल्ह्यात बाळापूर, तेल्हारा नगर पालिकेत शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी केली. राष्ट्रवादीने (शरद पवार गट) प्रत्येकी दोन ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी, तर दोन ठिकाणी स्वबळावर आहे. तेल्हारा वगळता वंचित आघाडी स्वबळावर आहे. वाशीम जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवण्यात येत असून तीन ठिकाणी काँग्रेस, तर दोन ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर नगर पालिका आणि हिवरखेड, बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी भाजपने उमेदवार दिले. अकोट येथे माया धुळे, मूर्तिजापूर हर्षल साबळे, हिवरखेड सुलभा दुतोंडे, तेल्हारा वैशाली पालीवाल, बाळापूर धनश्री अंबाडे व बार्शीटाकळी येथे कोकिळा येळवणकार यांना उमेदवारी दिली. उमेदवार जाहीर होताच भाजप पक्षांतर्गत अनेक इच्छूक नाराज झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर असून त्यांनी चार ठिकाणी अध्यक्ष पदासह ८८ उमेदवार दिले आहेत. शिवसेना शिंदे गट देखील स्वबळावर रिंगणात असून नव्या दमाचे उमेदवार दिल्याचे जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सांगितले.

काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाने बाळापूर आणि तेल्हारा नगर पालिकेसाठी आघाडी केली. बाळापूरमध्ये काँग्रेस, तर तेल्हारा येथे शिवसेनेचा उमेदवार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी दिली. अकोट आणि मूर्तिजापूरमध्ये शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाची आघाडी आहे. बाळापूर आणि हिवरखेड काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे म्हणाले. बार्शीटाकळी, अकोट, मूर्तिजापूर येथे काँग्रेस, तर बार्शीटाकळी आणि तेल्हारा राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे. वाशीम जिल्ह्यात रिसोडमध्ये महायुती झाली. याठिकाणी भाजपचा उमेदवार आहे. वाशीम, कारंजा, मंगरुळपीर नगरपालिका आणि मालेगाव नगर पंचायत भाजप स्वबळावर लढण्यात असल्याचे भाजप नेते राजू पाटील राजे यांनी सांगितले. महाविकास आघाडी एकत्रित लढत असून वाशीम व रिसोडची जागेवरून शिवसेना, तर उर्वरित तीन जागेवर काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.  

वाशीम जिल्ह्यातील पाचही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढत असून तीन ठिकाणी काँग्रेस, तर दोन ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट देखील सोबत आहे. – अमित झनक, काँग्रेस आमदार, वाशीम.

शिवसेना ठाकरे गट पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरला असून काही ठिकाणी काँग्रेस, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली आहे. पक्षाचे जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. – नितीन देशमुख, आमदार शिवसेना ठाकरे गट

राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरला आहे. अकोला जिल्ह्यात चार ठिकाणी अध्यक्षपदासह ८८ उमेदवार पक्षाचे आहेत. भाजपनंतर सर्वाधिक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.- अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी अजित पवार गट.