नागपूर : राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ४०० पर्यंत गेली असताना, प्रदूषणाचे संकट आता देशभरातील इतर शहरांमध्ये पसरत आहे. दिल्ली-एनसीआरसह महाराष्ट्राची राजधानी नागपूरमधील हवेची गुणवत्ता देखील ‘खराब’ श्रेणीत पोहोचली आहे. दिवाळीच्या दिवशी शहराची हवेची गुणवत्ता सर्वात वाईट पातळीवर नोंदवली गेली. २१ ऑक्टोबरच्या रात्री शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०४ चा टप्पा ओलांडला.

दिवाळीच्या दिवशी राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ३५० पेक्षा जास्त होती. नागपूर शहर देखील दिल्लीच्याच पावलावर पाऊल टाकत आहे. २१ ऑक्टोबरच्या दिवाळीच्या दिवशी नागपूर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०४ वर नोंदवला गेला. शहरातील सिव्हिल लाईन्स हे क्षेत्र सर्वाधिक हिरवळीचे मानले जाते. सर्वाधिक स्वच्छ क्षेत्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्समध्येही हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत पोहोचली. गेल्या वर्षीदेखील दिवाळीदरम्यान, नागपूर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक याच पातळीवर नोंदवला गेला होता. सिव्हिल लाईन्ससह वाडी, बाबुलखेडा, रामनगर आणि महाल कॉम्प्लेक्समधील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब राहिली. प्रदूषणाच्या या पातळीमुळे नागपूरकरांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सोमवारी अनेकांनी लक्ष्मीपूजन केले, पण यादिवशी फटाके खूप जास्त प्रमाणात फोडले गेले नाही.

मंगळवारीदेखील नागरिकांनी लक्ष्मीपूजन केले आणि यादिवशी मात्र शहरात खूप मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले. रात्री ११ वाजेपर्यंत कानठळ्या बसवणारे फटाके फोडले गेले. घराची दारे बंद करूनही फटाक्यांचा आवाज मात्र कमी नव्हता. तर त्याचवेळी या फटाक्यांमुळे आकाशात देखील धुरांचे ढग तयार झाले होते. त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी आता त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

फटाक्यांचा फटका

दिवाळीच्या पूर्वसंध्येपासूनच शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ दिसून आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत फटाक्यांचे प्रमाणही यंदा अधिक आहे. एरवी हिवाळ्यात हवेतील प्रदूषणात वाढ होते. मात्र, यावेळी अजूनही थंडीची सुरुवात झाली नाही. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येत आहेत. याचा परिणाम शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर स्पष्टपणे दिसून आला. गेल्या तीन चार दिवसांपासूनच शहरातील हवेची गुणवत्ता खालावलेली दिसून आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार नागपूर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक २० ऑक्टोबरला १७४ नोंदवला गेला होता. तर २१ ऑक्टोबरला तो २०४ पर्यंत वाढलेला दिसून आला.