गोंदिया : मराठा आरक्षणाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाची भूमिका अगदी स्पष्ट आहे आणि राज्य सरकारची भूमिका पण तितकीच स्पष्ट आहे की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. यात जे काही न्यायिक आणि तांत्रिक अडचण आहे. त्याला दूर कशी करायची यासाठी सरकारमधील तीनही पक्षांचा चिंतन मंथन सुरू आहे. फक्त मराठा समाजाने आणि जरांगे पाटलांनी संयम आणि धीर ठेवण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले. मंगळवारी रात्री रावण दहन कार्यक्रमाकरिता गोंदियात आले असतांना बुधवारी ते आपल्या जनसंपर्क कार्यालयात माध्यमांशी बोलत होते. या प्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे व माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.

मराठा आरक्षण विषयावर पुढे खा. पटेल म्हणाले की सरकार या बाबतीत सकारात्मक आहेच पण काही तांत्रिक बाबीचे निराकरण व्हायचे आहे. त्यामुळे यात उशिर होत आहे. कुणबी-मराठा चे प्रमाणपत्र निजामच्या काळातले होते. हे प्रमाणपत्र मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून मिळावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांचा त्यावेळी उपोषण सोडवतांनी जाहीर केलं होते. आणि त्यानंतर त्याची एक समिती स्थापन केली होती त्यांची पण कारवाई सुरूच आहे. म्हणून माझं तर थोडक्यात एवढंच म्हणायचं आहे की मराठा समाजांनी आणि त्यांच्या नेत्यांनी काही काळ संयम दाखवावा राज्य सरकार आणि यामधील तीनही पक्ष या बाबतीत सकारात्मक आणि अनुकूल आहेत. प्रत्येक शासकीय कामाला विशेषतः कायदयाच्या बाबतीत दुरूस्ती करण्यासाठी यातून सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी वेळ लागतच असतो. हा प्रश्न काही एक दिवसाचा नाही आहे. मागे ही मुख्यमंत्री असताना देवेन्द्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होते.

हेही वाचा >>>धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वेतील गर्दीबाबक उच्च न्यायालय काय म्हणाले वाचा…

हायकोर्टात तो विषय टिकला होता. पण सुप्रीम कोर्टात तो गेल्यानंतर त्यांनी यावर वेगळा निकाल दिला होता. आता यात जे काही अडचण आहे. त्या बाबतीत आम्ही संगळ्यांनी मिळून एक व्यवस्थीत मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच घाईगर्दीने काही निर्णय घ्यायचे आणि मग त्यातील फायदा मिळू शकला नाही तर मग परत सरकारच्या नावे बोंब ठोकायची, त्याकरिता मराठा समाज आणि विशेषतः जरांगे पाटलांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारचा कोणताही विरोध नाही तर ही सरकारच त्यांना आरक्षण |मिळावा करिता मराठा समाजाच्या सोबत असल्याचे मत खा. प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रा संदर्भात विचारले असता खा. पटेल म्हणाले की हे करण्याचा प्रत्येका अधिकार आहे या यात्रेतून त्यांना कळणार की महाराष्ट्र किती मोठा आहे त्याचा व्याप किती आहे. महाराष्ट्रातील प्रश्न किती गंभीर आहेत. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा संकल्प या यात्रेच्या माध्यमातून केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी एक वेगळा राजकारण केलं आहे. आता हे यात्रेचे राजकारण पण त्यांनी केल्यानंतर कळणार की विरोधात बसून टोमणे मारणे किती सोपे आणि प्रत्यक्षात जमिनीवर उतरून प्रश्नांचे गांभीर्य समजणे किती कठिन आहे. या दरम्यान ते विदर्भात येणार आहेत. त्यांचे स्वागत आहे.काल दसरा मेळाव्यात खा. संजय राउत यांनी सध्या चे युती सरकार है भ्रष्टाचारांनी बरबटलेले आहे अशी टीका केली होती तसेच आमचं सरकार आल्यास आम्ही भ्रष्टाचार मुक्त सरकार देवू असे जाहीर केलं आहे. यावर पटेल म्हणाले की संजय राउत यांच्या कोणत्याही उलट सुलट प्रश्नाचे उत्तर देणं मी योग्य समजत नाही.