लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अवकाळी पावसाने काढता पाय घेतला असे वाटत असतानाच राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. तीन दिवसांपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, तर अवकाळी पावसाने ते पुन्हा कमी झाले आहे. दरम्यान, उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याने उपराजधानीसह काही शहरांना आज अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

आज पहाटेपासूनच उपराजधानीत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी देखील पावसाने हजेरी लावली होती. आज आकाश पूर्णपणे ढगांनी काळवंडले आहे. पाच दिवसांच्या प्रचंड उष्णतेनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. दक्षिण भारतात “सायकलोनिक सर्क्युलेशन” तयार झाल्यामुळे पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

आणखी वाचा-उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…

दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा असला तरी मुंबई आणि कोकण किनारपट्टीला उष्णतेचा जाच सहन करावा लागणार आहे. मात्र, हवामान खात्याने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असणार, अशी शक्यता वर्तवली आहे.

विदर्भात वादळी पाऊस, गारपिटी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return of unseasonal rains in the state rgc 76 mrj