यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसाने खरीप पीक हातातून गेले आहे. उमरखेड, आर्णीसह अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. एकीकडे पावसाने झोडपलेला शेतकरी निसर्गाच्या अवकृपेची सजा भोगत असताना, ज्यांच्या भरवशावर या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे, ते महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी केरळमध्ये पर्यटनासोबतच मौजमजा करत आहेत.
आर्णी तालुक्यातील प्रशासकीय असंवेदनशीलतेचा कळस गाठणाऱ्या या वृत्तीचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. गेल्याच आठवड्यात यवतमाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र ही आदेश धाब्यावर बसवत आर्णी तालुक्यातील तीन मंडळ अधिकारी आणि ११ तलाठी दक्षिण भारताच्या सहलीवर गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली. यामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
आमच्या शेतातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे कोण करणार, असा प्रश्न शेतकरी बांधवांनी उपस्थित केला आहे. मात्र जिल्हाधिकार्यांनी याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. आर्णी तालुक्यात अरुणावती, अडाण आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टरवरील कापूस आणि सोयाबीनची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे बळीराजा पूर्णपणे खचला असून, अनेकजण आत्महत्येचा टोकाचा पर्याय स्वीकारत असल्याचे चित्र आहे.
शासनाकडून मदत मिळणार असे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी सांगितले. परंतु, ज्यांच्यावर पंचनाम्याची जबाबदारी आहे, तेच कर्मचारी पूरग्रस्त शेतकर्यांना वार्यावर सोडून दक्षिण भारतात सहलीवर गेले आहेत. आर्णी तहसील कार्यालयातील तीन मंडळ अधिकारी आणि ११ तलाठी सध्या केरळमध्ये महाराष्ट्र तलाठी संघाच्या अधिवेशनाच्या नावाखाली ‘पर्यटन’ करीत असल्याची धक्कादायक माहिती तहसील कार्यालयातूच बाहेर आली.
शेतकरी दररोज पंचनाम्याची विचारणा करण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारत असताना, त्यांना ११ तलाठी साज्यात नसल्याचे आढळले. नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही कर्मचारी जागेवर नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी याबाबत तहसीलदारांना विचारले असता, हे सर्वजण ‘प्रशिक्षणासाठी’ गेल्याची माहिती देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
गंभीर बाब : आमदार तोडसाम
आर्णी तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीने खचला असताना महसूल विभागतील १४, १५ अधिकारी, कर्मचारी एकाचवेळी रजा टाकून अधिवेशनानिमित्त पर्यटन करत असतील, तर ही गंभीर बाब आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी चर्चा करून कारवाईचे आदेश दिले जातील. प्रशासनाच्या वतीने मी शेतकऱ्यांची माफी मागतो. सर्व नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, अशी प्रतिक्रिया या भागाचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी तहसीलदार वाहूरवाघ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.