चंद्रपूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात भाजपातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. बावनकुळे यांनी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक व आमदार किशोर जोरगेवार अशा दोन्ही गटांना वेळ दिला. त्यांचे गाऱ्हाणे ऐकूण घेतले. मात्र, या गटबाजीवर व दोन्ही नेत्यांचे मनोमिलन कसे घडवून आणायचे हा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. तर वरिष्ठ नेतेच किंबहुना मुख्यमंत्री हेच स्थानिक गटबाजीला खतपाणी घालत असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.
जिल्ह्यात भाजपमध्ये उघडपणे गटबाजी सुरू झाली आहे. पूर्वी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री शोभा फडणवीस आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातही गटबाजी आणि मतभेद होते. मात्र, आता मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यातील मतभेद रस्त्यावर आले आहेत. गणेशोत्सवात स्वागत मंडपावरून दोन्ही गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर भिडले होते. त्यामुळे ही गटबाजी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. आता जिल्ह्यात मुख्यमंत्री, मंत्री, ज्येष्ठ नेते आले तरी ही गटबाजी उघडपणे दिसून येत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दौऱ्यात गटबाजीचे उघड दर्शन झाले होते.
महसूल मंत्री बावनकुळे यांच्या दौऱ्यात ही गटबाजी अधिक प्रकर्षाने दिसून आली. स्थानिक विश्रामगृहावर आमदार जोरगेवार यांनी बावनकुळे यांचे स्वागत केले, तिथेच मुनगंटीवार समर्थक भाजपचे ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा, माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनीही स्वागत केले. जोरगेवार गटाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले तर माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनीही निवासस्थानी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बावनकुळे यांच्या समोर दोन्ही गटाच्या समर्थकांनी गाऱ्हाणी मांडल्याची माहिती आहे.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांचे मनोमिलन घडवून आणणार असे सांगितले होते. मात्र, दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अबोला असल्याने मनोमिलन घडवून तरी कसे आणायचे हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, हा वाद मुंबई, दिल्ली पर्यंत पोहचला आहे. दरम्यान भाजपचे वरिष्ठ नेतेच या गटबाजीला खतपाणी घालत असल्याचीही चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात आहे. मुख्यमंत्री असो की मंत्री अथवा प्रदेशाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी. जिल्ह्यात आले की दोन्ही गटाच्या नेत्यांना, समर्थकांना स्वतंत्र वेळ देतात. त्यांच्या गाठीभेठी घेतात. निवासस्थानी भेट देऊन चहापान, जेवणाचा आस्वाद घेतात. त्यामुळेही ही गटबाजी वाढत चालली आहे. नेते जिल्ह्यात आले की त्यांनी सर्वांना समान लेखून एकत्र भेट घेतल्यास गटबाजी संपुष्टात येईल असेही बोलले जात आहे. मात्र, नेत्यांच्या अशा वागण्यामुळे गटबाजी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. त्याला स्थानिक नेत्यासोबतच प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतेही कारणीभूत आहे अशीही चर्चा आहे. या प्रकारामुळे भाजपचा प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ता वैतागलेला आहे.