नागपूर : महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाला दिलेले धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव व मंडळाच्या अस्पष्ट निकषांवर राज्यभरातील ऑटोरिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला आहे. या नावात दुरुस्ती व निकषांमध्ये स्पष्टता न केल्यास ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यभरातील ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांनी आंदोलन केल्यावर शासनाने महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले. परंतु, ऑटोरिक्षा चालक संघटनेशी चर्चा न करता महामंडळाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिले, असा या समितीचा आरोप आहे. या मंडळाला ऑटोरिक्षा चालकांसाठी संघर्ष करणाऱ्या शरद राव यांचे नाव देण्याची मागणी समितीने केली गेली.

हेही वाचा…नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यभरातील अनेक ऑटोरिक्षा चालक संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यात शरद राव यांचे नाव देण्याबाबत एकमत झाले. आता प्रत्येक जिल्ह्यातून तसे निवेदन शासनाला पाठवण्यात आले आहे. ऑटोरिक्षा मंडळाच्या इतरही अटींवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यात ऑटोरिक्षा चालकांना नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्क ५०० रुपये आणि वार्षिक शुल्क ३०० रुपये नको, ऑटोरिक्षा चालकांसाठी जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, विम्याची रक्कम किती, आरोग्यविषयक लाभ चालकासह त्याच्या कुटुंबीयांसाठी आहे का, कर्तव्यावर दुखापत झालेल्या आटोरिक्षा चालकाला अर्थसहाय्यक केवळ ५० हजार रुपये मान्य नाही, असे हे आक्षेप आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात समितीने आंदोलनाचा इशारा दिला असून असे आंदोलन झाल्यास विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…

कृती समितीची मागणी

ऑटोरिक्षा चालकाचा अपघाती वा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना दहा लाखांची आर्थिक मदत करा.

चालक व कुटुंबीयांना १० लाख रुपयापर्यंत वैद्यकीय संरक्षण द्या.

पाल्यांना उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयापर्यंतची तरतूद करा.

मुलीच्या लग्नासाठी ५ लाखांपर्यंत आर्थिक तरतूद करा.

बेघर चालकांसाठी घरे उपलब्ध करा.

नवीन ऑटोरिक्षा घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज द्या.

६५ वर्षांवरील चालकांना निवृत्ती वेतन द्या.

ऑटोरिक्षा चालकांशी चर्चा न करता आनंद दिघे यांचे नाव मंडळाला देणे योग्य नाही. आम्ही ऑटोरिक्षा चालकांसाठी संघर्ष करणाऱ्या शरद राव यांचे नाव मंडळाला देण्याची मागणी केली आहे. सोबतच मंडळाच्या निकषांमध्ये स्पष्टता हवी आहे. आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास होणाऱ्या आंदोलनाला सरकार जबाबदार राहील.- विलास भालेकर, राज्य सरचिटणीस, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw and taxi driver welfare boards warned of agitation if no changes in dharmaveer anand dighes name mnb 82 sud 02