RSS Centenary Celebration नागपूर: आपल्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेला जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे. अशा शक्ती भारतात तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत. हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाजात आमूलाग्र बदल साध्य करू शकतो. उलट, हिंसक घटनांमुळे जागतिक वर्चस्ववादी शक्तींना गैरफायदा घेण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा सोहळ्यात भागवत यांनी सरकार-प्रशासनाचे समाजाच्या प्रश्नांपासून झालेले दुर्लक्षही जनक्षोभ वाढण्याचे कारण ठरते, असे प्रतिपादन केले. मात्र ‘यासाठी हिंसक आंदोलन हा पर्याय राहू शकत नाही. आपले शेजारी देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडलेले आहेत. भारताच्या हितासाठी या देशांमध्ये शांतता, अत्यंत आवश्यक आहे. सरकारने दबावाला बळी न पडता आपली कर्तव्ये पार पाडावी,’ असे ते म्हणाले.

सध्या सुरू असलेली युद्धे, इतर संघर्ष, पर्यावरणीय ऱ्हासामुळे निसर्गाचा होणार कोप, समाज व कुटुंबांचे विघटन, नागरी जीवनात वाढता भ्रष्टाचार, अत्याचार या देखील भयावह गोष्टी आहेत. या समस्यांची वाढ थांबवण्यात अथवा संपूर्ण उपाय प्रदान करण्यात अयशस्वी ठरले आहोत, असे भागवत म्हणाले. महानगर संघचालक राजेश लोया यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्वंयसेवक उपस्थित होते.

खरे मित्र समजले

पहलगाम हल्ल्यानंतर आपण सुरक्षेबाबत अधिकाधिक सतर्क, राहिले पाहिजे. या निमित्ताने जगातील सर्व देशांनी घेतलेल्या धोरणात्मक कृतींवरून जगात आपले मित्र कोण आणि किती प्रमाणात आहेत याची देखील चाचपणी झाली, असे भागवत म्हणाले.

नक्षली भागासाठी व्यापक योजना हवी

सरकारच्या कठोर कारवाईमुळे, देशातील अतिरेकी नक्षलवादी चळवळीवर नियंत्रण मिळवता आले आहे.

सतत होणारे शोषण, अन्याय, विकासाचा अभाव ही नक्षलवादी उठावाची मूळ कारणे आहेत. त्यामुळे सरकारला त्या भागात विकास, सुसंवाद स्थापित करण्यासाठी एक व्यापक योजना तयार करावी लागेल.

हिंदूवर आक्षेप असेल तर भारतीय म्हणा

सर्व विविधतेला एकत्र ठेवणारी आपली संस्कृती हेच हिंदू राष्ट्रीयत्व आहे. कुणाला हिंदू शब्दावर आक्षेप आहे, त्यांनी हिंदवी म्हणावे नाहीतर भारतीय म्हणावे. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पण या राष्ट्रीयत्वाचे स्पष्ट स्वरूप व्यक्त करणारा हिंदू हा शब्द आहे. असेही भागवत म्हणाले.

दलाई लामांचा संदेश-

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दलाई लामा यांनी संदेश पाठवला,“संघाच्या १०० वर्षाच्या प्रवास हा समर्पण आणि सेवेचा आहे. संघाने नेहमी प्रत्येकाला जोडून ,दुर्गम भागात जाऊन शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचे काम संघाने केले. विविध भागात आलेल्या पूर परिस्थिती आणि अपघातात मदत करणाऱ्यांमध्ये संघ कायम अग्रेसर असता’ असे या संदेशात म्हटले आहे.

गडकरी, फडणवीसांसह विदेशी पाहुण्यांची उपस्थिती

सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही उद्योग जगतातील व्यक्ती आणि विदेशी पाहुण्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती

गांधी, आंबेडकर आणि संघ

माजी राष्ट्रपती रामनाथ कोवीद यांची कायक्रमातील प्रमुख उपस्थिती सोहोळ्याचे प्रमुख आकर्षण होते. त्यांनी महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांच्याबाबत काही प्रसंगाचा उल्लेख केला. ९ जानेवारी १९४० रोजी डॉ. आंबेडकर यांनी कराड (जि. सातारा) येथील संघ शाखेला भेट दिली होती. १६ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्लीतील संघ रॅलीत महात्मा गांधी सहभागी झाले होते, असा दावा त्यांनी केला.

ड्रोन पिनाका अग्निबाण

परंपरेनुसार, विजयादशमीच्या दिवशी संघाच्या मुख्य कार्यक्रमात तलवार, ढाल, भाले, धनुष्यबाण यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे पूजन होते. मात्र यंदाच्या शताब्दी वर्षात राष्ट्रीय सुरक्षेला समर्पित दृष्टिकोन ठेऊन संघाने आधुनिक युगाशी सुसंगत बदल केला. कार्यक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरले गेलेले उच्च-तंत्रज्ञान ड्रोन प्रमुख आकर्षण ठरले. तसेच चंद्रपूर आणि अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार झालेले पिनाका हे भारतीय बनावटीचे अग्निबाण देखील शस्त्रपूजनासाठी ठेवण्यात आले होते.