नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी ‘दिवाळीत धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचे’ आवाहन केले. यानंतर त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप झाला आणि वादाला तोंड फुटले आहे. हा वाद केवळ विरोधकांपुरता मर्यादित राहिला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रीस नायकवाडी यांच्यासह स्वतः अजित पवार यांनीही जगताप यांच्या या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली.
मात्र, यानंतरही संग्राम जगताप यांच्या भूमिकेत बदल झालेला दिसला नाही. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या कथित विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
दिवाळीच्या काळात हिंदू व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करण्याच्या जगताप यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्यारे खान यांनी हे विधान संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला शोभणारे नाही असे स्पष्ट केले. प्यारे खान म्हणाले, संग्राम जगताप एका संवैधानिक पदावर आहेत, त्यांना अशा भाषेचा वापर करणे शोभत नाही.
हिंदू-मुसलमान हे इतके एकमेकांशी जोडले गेले आहेत की त्यांना कोणी तोडू शकत नाही. महाराष्ट्रात अशा विधानांमुळे तणाव निर्माण करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील सामाजिक आणि व्यावसायिक एकतेवर भर देत खान म्हणाले, जर एखादा हिंदू शेतकरी शेती करत असेल, तर त्याचे धान्य मुसलमान खरेदी करतो आणि खातो.
जर विमानाचा पायलट मुस्लिम असेल, तर त्यात अनेक हिंदू प्रवासी बसलेले असतात. ही आपल्या देशाची व्यवस्था आहे. त्यांनी पुढे म्हटले की, जे खरे सनातनी लोक आहेत, या देशातील सर्वात मोठे सनातनी लोक आहेत, ते कधीही अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत नाहीत. ते राष्ट्राला आणि देशाला बनवण्याचे काम करतात.
दिवाळीच्या खरेदी-विक्रीच्या संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, व्यापार हा सर्व समाजाचा असतो. मुसलमान देखील मोठ्या संख्येने त्यांच्या मुलांसाठी फटाके आणतात, आणि ते हिंदूंच्या दुकानातूनही खरेदी करतात. फटाक्यांची बहुतेक दुकाने हिंदू समाजाच्या लोकांची देखील असतात, त्यामुळे हा सगळ्यांचाच व्यापार आहे, असे ते म्हणाले. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांच्यावर केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले.
तसेच, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था कायम राहील यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आणि जोपर्यंत हे सरकार येथे आहे, तोपर्यंत असे काहीही होणार नाही, असे प्यारे खान यांनी ठामपणे सांगितले.