चंद्रपूर : राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांसह इतरही विविध पदे रिक्त आहेत. यासंदर्भात गठित केलेल्या समितीने नुकताच शासनाकडे अहवाल सादर केला. समितीच्या अहवालानुसार आरक्षणाचा विषय निकाली काढण्यात येणार असल्याने लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल. तातडीने रिक्त पदे भरती जातील. आरक्षणानुसारच भरतीत क्रीडा, कला, तसेच इतरही विषयाच्या शिक्षकाला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावरील शाळांना भेटी द्याव्यात. त्यामुळे स्थानिक स्तरावर छोट्या छोट्या अडीअडचणींची माहिती होते व प्रश्न सहजासहजी सुटण्यास मदत होते. शाळांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर सी.एस.आर फंड, खनिज विकास निधी व इतर स्त्रोतातूनही निधी उपलब्ध होऊ शकतो. इयत्ता ४ थी आणि ७ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे.

शाळांची पटसंख्या वाढवणे आवश्यक असून ‘आधार अपार’मध्ये काम वाढवावे. शैक्षणिक कामे या महिन्याअखेरपर्यंत मार्गी लावावी, असे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले. यावेळी शिक्षणमंत्री भुसे यांची विविध संघटनांनी भेट घेऊन निवेदन दिले.

मटकी उसळचा आस्वाद

गडचिरोलीहून चंद्रपुरात येत असताना शिक्षणमंत्री भुसे यांनी मूल तालुक्यातील आगडी आणि चिचपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधला. चिचपल्ली जिल्हा परिषद शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मटकीच्या उसळीचा आस्वाद घेतला.