अमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह, शेतमालाला हमीभाव, मच्छीमार, शेतमजूर आणि मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील ‘महाएल्गार आंदोलना’ला आज निर्णायक वळण लागले. शेकडो ट्रॅक्टरसह बच्चू कडूंचा विराट ताफा बेलोरा (ता. चांदूरबाजार) येथून नागपूरच्या दिशेने रवाना झाला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांशी आता बच्चू कडू आणि समर्थक ‘आरपार’च्या लढाईसाठी सज्ज झाल्याचे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
शासनाच्या घोषणांवर शेतकऱ्यांचा विश्वास संपला आहे. आता त्यांचा तिरंगा म्हणजेच त्यांचा आवाज बनला आहे. आंदोलनात गोळी चालली तर पहिली गोळी मी माझ्या छातीवर घेईल, असे बच्चू कडू म्हणाले. निवडणुकीपूर्वी सरकारने ‘सातबारा कोरा करू’ म्हणून दिलेली घोषणा आज केवळ फसवणुकीचा कागद ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अतिवृष्टी, ढगफुटी आणि बाजारात शेतमालाला न मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापसावरील आयातशुल्क माफ करण्यात आले आणि परदेशी कापूस देशात आला. यामुळे देशातील कापूस अक्षरशः रस्त्यावर आला आहे. सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३३० असताना, शेतकऱ्याला ते केवळ ५०० ते ३ हजार रुपये या दरात विकावे लागत आहे. यंदा दिवाळी काळोखात बुडाली, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचा पाठिंबा
महाएल्गार आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, काँग्रेस पक्षानेही या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रक काढून पाठिंबा जाहीर केला. बच्चू कडू यांनी भ्रमणध्वनीवरून सपकाळ यांचे आभार मानले आणि आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली.
अमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह, शेतमालाला हमीभाव, मच्छीमार, शेतमजूर आणि मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील ‘महाएल्गार आंदोलना’ला आज निर्णायक वळण लागले. https://t.co/2jrmCKvB4K@RealBacchuKadu pic.twitter.com/VvY24hXZeD
— LoksattaLive (@LoksattaLive) October 27, 2025
बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. ‘आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. आमच्या पिढ्या जगवायच्या असतील, तर ही आरपारची लढाई लढायलाच हवी!’ असे कडू यांनी ठामपणे सांगितले.
मेंढपाळ आणि मच्छीमारही मैदानात
या आंदोलनात मराठवाडा आणि विदर्भातील मेंढपाळ बांधव तसेच मच्छीमार समाजही सहभागी झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शेकडो बैल, शेळ्या-मेंढ्या घेऊन हे बांधव नागपूरकडे कूच करत आहेत. ‘आमचे पोट शेतीवर अवलंबून, आणि शासनाचे धोरण आमच्याच विरोधात!’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
हा ताफा आज वर्धा येथे मुक्कामी असून, उद्या, २८ ऑक्टोबरपासून हा मोर्चा नागपूरच्या दिशेने पुढे सरकणार आहे. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
