अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दरम्‍यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात ठरावही केला आहे. त्यामुळे सुजात आंबेडकर अमरावतीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बुलढाणा: अपक्ष म्हणून प्रचार पण… नजर पक्षांच्या उमेदवारीवर!

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार, याचा अद्यापही निर्णय झालेला नाही. महायुतीतही या मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत नवनीत राणा, आनंदराव अडसूळ यांच्या नावाची चर्चा आहे. आता वंचित आघाडीने अमरावतीतून रिंगणात उतरण्‍याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीकडे अमरावतीच्‍या जागेची मागणी करण्‍यात आली आहे. अमरावती हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव असल्‍याने काँग्रेसने या मतदार संघावर आधीच दावा केला आहे. महाविकास आघाडीत हा मतदार संघ कुणाच्‍या वाट्याला येतो, याची उत्‍सुकता ताणली गेली आहे.

हेही वाचा >>> सोमवारपासून पुन्हा पाऊस…..

अमरावतीच्‍या सायन्‍स कोर मैदानात काही दिवसांपुर्वी आयोजित  लोकशाही गौरव महासभेच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या शक्तिप्रदर्शनाची चर्चा रंगली होती. याच सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपपेक्षा काँग्रेसवर केलेला टीकेचा मारा, स्‍वबळावर लढण्‍याची दर्शविलेली तयारी यातूनच आंबेडकरांनी काँग्रेससमोरील अडचणी वाढविल्‍या होत्या. आता पुन्हा अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आल्याने काँग्रेससाठी हा धक्‍का मानला जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक ठराव घेऊन सुजात आंबेडकर यांना अमरावतीची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. या ठरावात अमरावतीच्‍या जागेवर सुजात आंबेडकर यांनी लढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीकडे ही मागणी केली आहे. या ठरावावर जिल्हाभरातील कार्यकर्त्यांच्‍या स्वाक्षरी आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi workers demand sujat ambedkar name for amravati lok sabha constituency mma73 zws