अमरावती : मुंबई ते हावडा मार्गावर रेल्वेसेवा सुरू होऊन सुमारे १२५ वर्षे झाली आहेत. विदर्भवासीयांना मुंबईला जाण्यासाठी निवडक एक्स्प्रेस उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादी लांब असते. मुंबई आणि पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी, ही विदर्भवासीयांची इच्छा केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लवकरच नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून गेल्या जानेवारी महिन्यात देण्यात आली होती. मध्य रेल्वेच्या नागपूर बोर्डाने या संदर्भात रेल्वे बोर्डाला प्रस्ताव सादर केला असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पण, अजूनही रेल्वे बोर्डाने मंजूरी दिलेली नाही.

सध्या नागपूरहून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-इंदूर आणि नागपूर-बिलासपूर अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे या दोन्ही मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. तथापि, गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने, गरजू प्रवासी अनेकदा आगाऊ पैसे खर्च करून पर्याय म्हणून खाजगी बसेस निवडतात. रेल्वेची प्रतीक्षा यादी मोठी होते. त्यामुळे नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे मार्गांवर नवीन गाड्या सुरू करण्याची प्रवाशांकडून मागणी आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाला या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस जोडण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

नागपूर-मुंबई प्रवास करण्यासाठी मेलला १६ तास लागतात, तर सुपरफास्ट गाड्या १२ ते १३ तास घेतात आणि दुरांतो एक्स्प्रेस ११ ते १२ तासांत मुंबईला पोहोचते. वंदे भारत जोडल्याने नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ १० तासांनी आणि नागपूर ते पुणे तीन तासांनी कमी होईल. नागपूर-पुणे मार्गावर दररोज सुमारे ६ हजार प्रवासी प्रवास करतात.

सध्या, नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि गरीब रथ एक्स्प्रेस नागपूरहून आठवड्यातून तीन वेळा धावते तर हमसफर एक्सप्रे एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा धावते, मुंबईला जाण्यासाठी दुरांतो, विदर्भ, सेवाग्राम एक्स्प्रेस आहे. अमरावती हून मुंबई आणि पुणे येथे जाण्यासाठी दोन नियतिम एक्स्प्रेस उपलब्ध आहेत. पण, तरीही मुंबई आणि पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने ही रेल्वेसेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.