अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप वगळता इतर पक्षांशी युती करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी आहे. त्यासंदर्भात काही ठिकाणी चर्चा देखील सुरू आहेत. याचे सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी दिली. महानगर पालिका निवडणुकीमध्ये प्रभाग पद्धतीचा अवलंब करून छोट्या पक्षांना संपवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.

अकोला येथे दौऱ्यावर आले असतांना त्यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील राजकारण, वंचितची आगामी काळातील वाटचाल यासह विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. त्या म्हणाल्या, ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढण्यासाठी वंचितने मोर्चेबांधणी केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वंचित आघाडीची संघटनात्मक बांधणी मजबूत केली. प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांचे मत विचारात घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर इतर पक्षांशी युती करण्याची वंचित आघाडीची तयारी असून त्याचे सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. योग्य प्रस्ताव आल्यास तो राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे मांडून युतीसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.’

महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग पद्धतीचा अवलंब केल्याने छोट्या पक्षांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. अगोदर वॉर्ड पद्धतीने झालेल्या निवडणुकीमध्ये विविध महापालिकेत छोट्या पक्षांचे नगरसेवक निवडून येत होते. मात्र, प्रभाग पद्धतीमुळे विशिष्ट प्रस्थापित पक्षांशी मक्तेदारी वाढली. छोट्या पक्षांवर गंडांतर आणण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका देखील प्रा.आंबेडकर यांनी केली.

अकोला जिल्हा परिषद हे वंचितचे सत्ताकेंद्र आहे. आगामी निवडणुकीनंतर अकोला जिल्हा परिषदेची सत्ता कायम राखण्याच्या दृष्टीने वंचितने रणनीती आणखी. त्याचाच एक भाग म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आलेली मरगळ दूर करून सर्व जण नव्या दमाने तयारीला लागल्याचे चित्र दिसून आले. उमेदवारी देण्यासंदर्भातही पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सर्वानुमते नावे मागवली आहेत. अशी नावे आल्यानंतर त्यांना निश्चित संधी दिली जाईल, असेही प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, विकास सदांशिव, सचिन शिराळे आदी उपस्थित होते.  

शिवसेना शिंदे गट, काँग्रेससोबत चर्चा

स्थानिक निवडणुकांमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर आदींसह काही ठिकाणी युती संदर्भात वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची काँग्रेस, शिवसेना शिंदे गटासोबत प्राथमिक चर्चा झाली. योग्य प्रस्ताव आल्यास युती संदर्भात निश्चित पुढे जाता येईल, असे सूतोवाच प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले. अकोला हा वंचितचा गड असून पक्षाच्या वर्चस्व असलेल्या जागा वगळता इतर ठिकाणच्या बाबतीत युतीसाठी विचार होऊ शकतो, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

बौद्ध संवाद अभियानामुळे पक्षाला लाभ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकामध्ये पक्षापासून काही प्रमाणात दुरावलेल्या बौद्ध समाजासोबत मुंबई, विदर्भ व इतर जिल्ह्यांमध्ये संवाद अभियान राबविण्यात आले. त्याचा पक्षाला लाभ होत असून संघटनात्मक कार्याला बळ मिळाल्याचे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.