नागपूर : अवकाळी, गारपीट आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रू असताना राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री मात्र दुसऱ्या राज्यातील निवडणूक प्रचारात दंग होते, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना वेळच नसल्याची टीका विरोधी पक्षतेने विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी सरकारवर केली. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी मंत्र्यांसमवेत नागपूर जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून बाधितांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विधानसभेत विरोधकांनी स्थगनच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्याच्या व्यथा सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. वडेट्टीवार यांनी विधानसभेत राज्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, मीचाँग चक्रीवादळामुळे शेतकरी उद्धवस्थ झाल्याचे सांगत सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. देशात शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री व अन्य मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर न फिरता निवडणूक प्रचारात व्यस्त होते असा वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

हेही वाचा >>>ओबीसी समाजाच्या न्यायिक मागणीसाठी अन्नत्याग, आंदोलनाचा दुसरा टप्पा; चिमूर क्रांती भूमीतून सुरुवात

विदर्भ,मराठवाडय़ातील शेतकरी संकटात आहे. कापूस, धान, संत्रा, द्राक्ष, कांदा,सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या नंतर काही मंत्री पाहणी करण्यासाठी केले. सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या पण पंचनामे होत नाहीत. सरकारने केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून याच तालुक्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी(एनडीआरएफ)तून मदत मिळणार आहे. तर ज्या १२०० महसूली मंडळात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे तेथील शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळताना ४० तालुक्यांना केंद्रांच्या निकषाप्रमाणे जशी मदत दिली जाणार आहे.तशीच मदत राज्य सरकार आपल्या निधीतून १२०० दुष्काळी महसूली मंडळातील शेतकऱ्यांना देणार आहे. तसेच दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी अशा सर्वाचीच नुकसान भरपाई देण्याची कारवाई सुरु असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

शिंदे आणि फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा निमखेडा या गावांना भेटी देत नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यामध्ये या पावसाचा जवळपास १२४ गावांना फटका बसला असून ८५२ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Visited the villages of nagpur district to inspect the damage caused by unseasonal rains and interacted with the farmers amy