वर्धा : शुक्रवारची रात्र जिल्ह्यासाठी काळरात्र ठरली. दोन वेगवेगळ्या घटनेत चारजण मृत्यूमुखी पडले. यात एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता नागपूर वर्धा बायपास मार्गावर इव्हेंट सभागृहापुढे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
नागपूरवरून एमएच ३२ – ८९३८ या क्रमांकाची कार भरधाव वेगात वर्धेकडे येत असतांना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित झाली. त्याच वेगात ती दुभाजक ओलांडून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनर वाहनास धडकली. ही धडक जबर वेगात असल्याने कारमधील कमलाबाई शंकरसिंग ठाकूर वय ८५ यांचा तसेच गजानन तिडके ४७ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुप्रिया राजेशसिंग ठाकूर, अवंतिका राजेशसिंग ठाकूर व कारचालक दीपक हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर शर्थीचे उपचार सूरू झाले. सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सूरू केला. तसेच चार तासापासून ठप्प वाहतूक सुरळीत करणे सूरू केले. कुटुंबप्रमुख राजेशसिंग ठाकूर यांचा चार महिन्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर आता त्यांच्या आईचा मृत्यू व पत्नी, मुलगी गंभीर जखमी झाल्याने ठाकूर कुटुंबावार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शुक्रवारी रात्रीच घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत काका पुतण्याचा वीज पडून मृत्यू झाला. हिंगणघाट तालुक्यातील वायगाव निपाणीलगत असलेल्या भिवापूर येथे ही घटना घडली. येथील अनिल दत्तूजी ठाकरे, ४१, सौरभ गजानन ठाकरे,२५ व वेदांत अनिल ठाकरे १८ हे तिघे मोटारसायकलने निघाले होते. चारमंडळ येथे आत्याकडे एका कार्यक्रमासाठी तिघे निघाले होते.
धोत्रामार्गे त्यांची गाडी जात असतांना वाटेत जोरदार पाऊस सूरू झाला. धोका नको म्हणून ते वाटेत एका झाडाखाली थांबले. रेनकोट घालून उभे असतांना विजेचा कडकडाट सूरू झाला. वीज या गाडीवर पडली. त्यात अनिल दत्तूजी ठाकरे व सौरभ गजानन ठाकरे हे जागेवरच ठार झाले. तर वेदांत अनिल ठाकरे यास जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सूरू आहे.
या दोन्ही घटना शुक्रवारी रात्री घडल्या. त्यात चार ठार व चार गंभीर जखमी झाल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. नागपूर वर्धा बायपास वरील अपघात तर सर्वांना चटका लावणारा ठरला आहे. आईस नागपूरला हलविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलीची प्रकृतीत सुधारणा होत आहे.