वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालेली आहे. तयारीत आघाडीवर असणाऱ्या भाजपच्या तुलनेत मागे पडलेल्या काँग्रेसने पण कंबर कसलीय. आज त्याचीच चुणूक दिसणार. राज्यातील काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आज मुंबईत दाखल झाले आहेत. दुपारी एक वाजता त्यांचा संवाद होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्षाचे महाराष्ट्राचे नवे प्रभारी रमेश चेंनिथला हे आज दुपारी मुंबईत येणार असून ते या जिल्हाध्यक्ष मंडळींसोबत चर्चा करतील. जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी यास दुजोरा दिला. मात्र अधिक भाष्य टाळले. पक्षाने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची नावे बुधवारपर्यंत मागविली होती. मात्र, त्यात गमतीचाच प्रकार अधिक झाला. एका पदाधिकाऱ्याने नमूद केले की, नाव वाचून हसावे की रडावे, हेच कळत नाही. गांभीर्याने कोणास घ्यावे, हेच कळत नसल्याने नावे माध्यमांना सांगता पण येत नाही.

हेही वाचा : मुलीच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल

वर्धा जिल्ह्यातून ‘या’ उमेदवाराच्या नावाची चर्चा

ज्येष्ठ आमदार रणजीत कांबळे तसेच माजी आमदार अमर काळे यांनी लढण्यास स्पष्ट नकार कळविला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते डॉ. शिरीष गोडे यांना मनधरणी करीत लढण्याची तयारी होत असल्याची माहिती मिळाली. डॉ.गोडे यांनी यास दुजोरा दिला. डॉ. गोडे हे तीन टर्म भाजपचे जिल्हाध्यक्ष राहून चुकले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मूळचे ते काँग्रेसी कुटुंबातून आले असून त्यांचे वडील संतोषराव गोडे हे १९७८ मध्ये काँग्रेसचे खासदार होते. एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख दिल्या जाते. त्यांच्या नावावर कांबळे, शेंडे, काळे गट सहमत होवू शकतो, असे म्हटल्या जाते. मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट होकार दिलेला नाही.

हेही वाचा : अनैतिक संबंधातून मित्राच्या पत्नीचा खून, मृतदेह पोत्यात बांधून…

काँग्रेसचे दबावतंत्र!

चारुलता टोकस या गतवेळच्या उमेदवार यावेळी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी ‘पात्र’ उमेदवार शोधण्याची कामगिरी काँग्रेसला करावी लागणार आहे. आज पक्ष प्रभारी चेन्नीथला याच बाबीवर झाडाझडती घेण्याची शक्यता व्यक्त होते. आज इच्छुकांची नावे घेण्याचा प्रकार हा केवळ दबावतंत्राचा भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha maharashtra congress all districts presidents called in mumbai for meeting pmd 64 css