नागपूरवरून पुण्याला जाणारी खासगी बस वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे थांबली असता चालक बसचा वाहन क्रमांक खोडून दुसरा क्रमांक टाकत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यावरून शेलुबाजार येथे नाकाबंदी करून पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली. वाहन क्रमांक बदलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार संतोष मनवर, मंगरुळपीर यांनी रविवारी याबाबत तक्रार दिली. क्रमांक बद्दलवण्यात आलेली खासगी बस नागपूरवरून शेलुबाजार मार्गे पुण्याला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी बस क्रमांक के.ए. ५१, ए.बी. ३६२७ थांबवून पाहणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कागदपत्रे मागितली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सखोल पाहणी केली असता वाहनावर के.ए. ५१ एबी ३६२७ असा क्रमांक होता. चेचीस क्रमांक ऑनलाईन तपासला असता वाहनाचा नोंदणी क्रमांक के. ए. ५१ डी. ८७१२ असल्याचे आढळून आले. वाहन क्र. ८७१२ चा वाहन कर दि. ३१/८/२०२१ पर्यंत भरलेला असून योग्यता प्रमाणपत्र दि.२२/१२/२१ रोजी संपलेले आहे. वाहनाचा विमा, पीयुसी व परवान्याची वैधता ऑनलाईन प्रणालीत आढळून आली नाही. यावरून वाहनचालक जमिलुद्दीन शेरफुदीन (४८, रा. चिंचवड), अर्जुन प्रभाकर हिवरकर (३८, रा. येरद, ता. यवतमाळ) व लखन उर्फ राम राजू राठोड (३२, रा. शेलोडी, ता. दारव्हा) यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी केडगे यांच्या मार्गदर्शनात एपीआय मंजूषा मोरे करीत आहेत.

हेही वाचा : धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला ‘ते’च जबाबदार ; आमदार संजय गायकवाड

शनिवारी पहाटे नाशिक जिल्ह्यात चिंतामणी ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन पेट घेतल्याने १२ प्रवाशांचा नाहक बळी गेला. या अपघातावरून खासगी बस सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच एकाच बसचे दोन क्रमांक, त्यातही योग्यता प्रमाणपत्र, विमा आदी कागदपत्रांचा कार्यकाळ संपलेला असताना शासनाची दिशाभूल करून प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याबाबत खासगी बसवर पोलिसांनी कारवाई केली. यावरून खासगी बस चालकांचा गोरखधंदा उघड झाला असून परिवहन विभागाने सर्वच खासगी बसगाड्यांची तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Washim police case registered against private bus over cheating by using two number tmb 01